मनीष सिसोदिया यांची ईडीकडून पुन्हा चौकशी; के. कविता शनिवारी हजर राहणार | पुढारी

मनीष सिसोदिया यांची ईडीकडून पुन्हा चौकशी; के. कविता शनिवारी हजर राहणार

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मद्य धोरण घोटाळा प्रकरणात गंभीर आरोप झालेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सक्तवसुली संचलनालयाने आज (दि.९) तिहार तुरुंगात चौकशी केली. उद्या शुक्रवारी देखील त्यांची चौकशी होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान याच घोटाळा प्रकरणात नाव आलेल्या बीआरएस नेत्या के. कविता शनिवारी (दि.११) ईडी पथकासमोर हजर राहणार आहेत.

मद्य धोरण घोटाळ्यातील सिसोदिया यांच्या भूमिकेचा ईडी तपास करीत आहे. वारंवार फोन बदलून पुरावे नष्ट करणे, मद्यविक्री करणाऱ्या घाऊक व्यापाऱ्यांचे कमिशन 5 टक्क्यांवरून वाढवून 12 टक्के करणे, या बदल्यात लाच घेणे, दक्षिण भारतातील मद्य कार्टेलकडून आप नेता विजय नायरच्या माध्यमातून पैसे घेणे याशिवाय मद्य धोरण बदलण्यातील त्यांच्या भूमिकेचा तपास सुरु आहे. घोटाळ्याची व्याप्ती आणि पैसा कसा आला, कसा गेला, या बाबींवर तपासाचा केंद्रबिंदू असल्याचे ईडी सूत्रांचे म्हणणे आहे. सिसोदिया यांना 26 फेब्रुवारी रोजी सीबीआयने अटक केली होती. तर विशेष न्यायालयाने त्यांची 20 मार्चपर्यंत कोठडीत रवानगी केलेली आहे.

दरम्यान घोटाळ्यातील दक्षिण भारत कार्टेलमध्ये सामील असल्याचा संशय असलेल्या बीआरएस नेत्या के. कविता शनिवारी ईडीच्या पथकासमोर हजर राहणार आहेत. वास्तविक कविता यांची आज चौकशी होणार होती. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांचा हवाला देत त्यांनी शनिवारी हजर राहण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केली होती. ईडीने ही विनंती मान्य केली आहे. के. कविता या तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या आहेत.

Back to top button