मुंबई, पुढारी ऑनलाईन: सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. राजू शेट्टी यांना भ्रमनिरास झाला आहे, त्यामुळे त्यांनी आत्मक्लेष यात्रा काढली आहे. पण खरा भ्रमनिरास तेव्हा झाला होता, जेव्हा मला मंत्रिपद मिळाले होते. आता त्यांनी काशीपर्यंत आत्मक्लेष यात्रा काढावी, असा उपहासात्मक सल्ला माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टी यांना दिला आहे.
राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.
पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी यांनी आत्मक्लेष यात्रा काढली आहे. या यात्रेच्या पार्श्वभूमीव खोत यांनी पत्रकारांशी बोलताना शेट्टींवर टीका केली.
खोत म्हणाले, 'राजू शेट्टी यांच्या आमदारकीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाय. त्यामुळे त्यांचा भ्रमनिरास झाला आहे, असे बोलले जाते.
पण त्यांचा खरा भ्रमनिरास तेव्हा झाला होता, जेव्हा मला मंत्रिपद मिळालं होतं. आता त्यांचा पुन्हा भ्रमनिरास झालेला दिसतोय.
त्यांनी आता काशीपर्यंत आत्मक्लेष यात्रा काढावी. राजू शेट्टींचं आंदोलन म्हणजे राजकीय दुकान चालवण्यासाठी आहे.
या सरकारकडून भ्रमनिरास झाला असेल तर राजू शेट्टींनी बाहेर पडावं.'
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीतून राष्ट्रवादी काँग्रेसनं राजू शेट्टींचं नाव वगळल्याची चर्चा आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी असे झालेले नसून राज्यपाल निर्णय घेत नसल्याचे सांगितले आहे. मात्र, शेट्टी म्हणाले होते, 'आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात झालेला समझोता पाळायचा की नाही पाळायचा, की पाठीत खंजीर खुपसायचा आणि कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्यांनी ठरवायचे आहे. माझ्या आमदारकीचा करेक्ट कार्यक्रम केला असले तर करेक्ट कार्यक्रमाच्या पुढेही करेक्ट कार्यक्रम असतो.' असा इशारा दिला होता.
हेही वाचा: