नागपूर ; पुढारी वृत्तसेवा : नागपूर जिल्ह्यातील गाडेघाट येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांपैकी यवतमाळचे चार जण नदीत बुडाले. ही घटना आज (रविवार) सकाळी घडली. हे चौघे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसचे रहिवासी होते. ते त्यांच्या कुटुंबीयांसह दर्शनासाठी आले होते. यवतमाळचे चारजण नदीत बुडाले हे समजल्यावर पोलिसांनी शोध मोहिम सुरू केली आहे.
चारजण पाण्यात बुडत असताना ९ लोक गाडीत बसून होते. तर चौघे पोहण्यासाठी नदीत उतरले. परंतू नदीच्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने हे चौघे बुडायला लागले. ते पाहून गाडीत बसलेला एक तरूण त्यांना वाचवण्यासाठी धावला. त्याने पाण्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही बुडून मरण पावला. कन्हान नदी, अम्मा का दर्गा, जुनी कामठी येथे हे पाच तरूण पोहायला गेले होते.
मृतकांमध्ये सय्यद अरबाज (वय २१), ख्वाजा बेग (वय १९), सप्तहीन शेख (वय २०), अय्याज बेग ( वय २२) आणि मो. आखुजर (वय २१) यांचा समावेश आहे. बुडालेल्यांचा स्थानिक पथकामार्फत शोध सुरू असून नदीच्या पाण्याच्या प्रवाहाला वेग असल्याने तहसीलदार, पारशिवणी यांनी एसडीआरएफ पथकाची मागणी केलेली आहे.