संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं सातपूर गावात पोलीस आयुक्तांकडून स्वागत

संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं सातपूर गावात पोलीस आयुक्तांकडून स्वागत

सातपूर (नाशिक) पुढारी वृतसेवा

धन्य धन्य निवृतीनाथा , काय माहिमा वर्णवा, असे अभंग मुखी गात हातात वारकरी सांप्रदायाच्या पताका, डोक्यावर कळस, तुळसीपात्र घेतलेल्या महिला, विणेकरी,  टाळकरी, पखवाजवादक व मानाच्या दिंडयासह हजारो वारकऱ्यांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा जयजयकार करीत आषाढी वारीसाठी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून श्रीक्षेत्र पंढरपुरच्या दिशेने सोमवारी सकाळी प्रस्थान केले.

संत श्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी समाधी मंदिर त्र्यंबकेश्वर येथून काल सकाळी दहा वाजता परंपरेच्या मानाच्या दिंड्या समवेत पंढरपुरकडे रवाना होत, संध्याकाळी पालखीचा पहिला मुक्काम असलेल्या सातपूर गावात सायंकाळी आठवाजेच्या सुमारास आगमन झाले. यावेळी गांवकरीसह पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी पालखीचे स्वागत केले. यावेळी ट्रस्टचे प्रशासक भाऊसाहेब गंभीरे यांचाही सत्कार करण्यात आला.

पालखीचा पहिला मुक्काम असल्याने सातपूर गावात भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. दोन वर्षाच्या कालखंडानंतर संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी निघाल्याने वारकरी तसेच गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत होते. विठ्ठल नामाच्या जयघोषात संतश्रेष्ठ  निवृत्तीनाथ महाराज  पालखीचे भक्तिमय वातावरणात सर्व  सातपूरकर ग्रामस्थांनी स्वागत केले.

यावेळी सातपूर गाव कमानी जवळ पालखीचे आगमन होताच गावाचे पोलिस पाटील राजाराम पाटील निगळ सह अन्य गावकऱ्यांनी दिंडीचे स्वागत करत मंदीराच्या प्रागंणात पालखी आली. यावेळी पोलिस आयुक्त नाईकनवरे यांनी पालखीचे विधीवत पुजन करून स्वागत केले.

सातपूर गाव ग्रामस्थ मंडळाने वारकरी लोकांच्या विश्रांती, स्नेह भोजन व  रात्र निवासाची सोय  प्राचीन  मारुती मंदिर   येथे केली. सातपूर पंचक्रोशीतील भाविकांसाठी पालखी मारूती मंदिर परिसरात दर्शनासाठी ठेवण्यात  अाली होती. रात्री भजन कीर्तन, प्रवचन  व  पालखीतील  वारकरी व सातपूर भाविकांसाठी  महाप्रसादाचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान दोन वर्षे भाविकांना या वारीला कोरोनामुळे मुकावे लागले. यावर्षी मात्र वारीसाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून आली. सातपूर गावात संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीचे आगमन झाले. यावेळी गर्दी असल्याने काही काळ मुख्य त्रंबक रस्त्यावरील वाहतुक बंद करण्यात आली होती. सातपूरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, क्राईम पिआय सतिश घोटेकर आदीसह मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

हा पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सातपूर ग्रामस्थ, भजनी मंडळ,  विविध मित्र मंडळ प्रयत्नशील होते. यावेळी आमदार सीमा हिरे, दिनकर पाटील, प्रकाश लोंढे, सीमा निगळ, शिशिकांत जाधव, मधुकर जाधव, भिवानंद काळे, रवी काळे,  ट्रस्टचे माजी पदाधिकारी मुरलीधर पाटील, त्र्यंबकराव भंदुरे, किशोर मुंदडा, गोकुळ निगळ, शिवाजी वाघ, मुरलीधर भंदुरे, सुनील मौले, छगन भंदुरे, नितीन निगळ, दिलीप भंदूरे, रवींद्र काश्मिरे, अनिल सोनवणे, प्रकाश मौले, ज्ञानेश्वर भंदुरे, कांतीलाल भंदुरे गीता जाधव, योगेश गांगुर्डे
आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news