येरवड्यातून रजेवर आलेले 3 कैदी पसार; हजर न झाल्याने कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल | पुढारी

येरवड्यातून रजेवर आलेले 3 कैदी पसार; हजर न झाल्याने कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

नगर, पुढारी वृत्तसेवा: पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या तीन आरोपींना अभिवचन रजेवर सोडल्यानंतर, ते पुन्हा कारागृहात हजर न झाल्याने त्यांच्याविरुद्ध येथील भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे दत्तात्रय लक्ष्मण किरवे (वय 39 रा. पोलिस क्वार्टर्स, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास गणेश नायडू (रा. कोंबडीवाला मळा, सोलापूर रस्ता, अहमदनगर), सूरज विठ्ठल वाल्मिकी (रा. इंदिरानगर, भिंगार), साहेबराव मोहन बेरड (रा. दरेवाडी ता. नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. एका गुन्ह्यामध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेले आरोपी नायडू, वाल्मिकी व बेरड यांना 12 मे, 2020 रोजी कोविड-19च्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन आकस्मित अभिवचन रजेवर सोडले होते. आरोपींना वेळोवेळी 23 वेळा रजा वाढवून दिली होती.

दरम्यान त्यांची अभिवचन रजा 1 जून, 2022 रोजी संपत असल्याने ते हजर होणे आवश्यक होते. परंतु, ते 11 जून, 2022 पर्यंत हजर न झाल्याने दत्तात्रय किरवे यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठून आरोपी नायडू, वाल्मिक व बेरड यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम 224 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक आर. टी. गोरे करीत आहेत.

हेही वाचा

सातार्‍यात खुल्या प्रवर्गासाठी 43 जागा

राजापूरला प्रथमच मिळणार अनुसूचित जातीचे प्रतिनिधित्व

महिलेचा मोबाईल लांबविणारे जेरबंद; पारनेर येथील घटना

Back to top button