राजगडचा पाली दरवाजा कोसळला; ‘पर्यटकांनी काळजी घ्यावी’

राजगड किल्ल्याच्या शिवकालीन पाली प्रवेशद्वारातील लाकडी दरवाजाची एक झडप कोसळून खाली पडली.
राजगड किल्ल्याच्या शिवकालीन पाली प्रवेशद्वारातील लाकडी दरवाजाची एक झडप कोसळून खाली पडली.

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा: राजगड किल्ल्याच्या राजमार्ग पाली प्रवेशद्वारात बसविण्यात आलेला लाकडी दरवाजा रिमझिम पावसात कोसळला. त्या वेळी पर्यटक नसल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना काल शनिवारी (दि. 18) सायंकाळी घडली.
राजगडसह इतर गडकोटांवर शिवकालीन शैलीत लाकडी दरवाजे बसविण्यात आलेत.

जोरदार वादळ व पावसात दरवाजे कोसळण्याची शक्यता आहे. पावसाळी पर्यटनासाठी गडकोटांवर मोठ्या संख्येने पर्यटक येतात. दरवाजे कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बसविण्यात आलेल्या दरवाजाची पुरेशी देखभाल, खबरदारी घ्यावी, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या महिन्यात पाली दरवाजासह राजगडाच्या विविध मार्गांवर सहा प्रवेशद्वारे बसविण्यात आली. पाली प्रवेशद्वाराच्या शिवकालीन दगडी चिरेबंदी कमानीवर दोन झडपांचा लाकडी दरवाजा बसविण्यात आला आहे. दरवाजाची उंची जवळपास वीस फूट असून, रुंदी 8 फूट आहे. दोन दिवसांपासून राजगडावर रिमझिम पाऊस पडत आहे तसेच वारेही वाहत आहे.

सायंकाळी अचानक पाली दरवाजाची एक झडप दगडातून निखळून कोसळली. त्या वेळी मोठा आवाज झाला. त्या वेळी दरवाजात कोणीही नव्हते. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. पुरातत्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे, सुरक्षारक्षक आकाश कचरे, विशाल पिलावरे, दीपक पिलावरे आदींनी धाव घेतली. पडलेला दरवाजा उचलून बाजूला ठेवला. पहरेकरी साबळे म्हणाले की, सध्या गडावर पाऊस, वादळी वारे वाहत आहे. वार्‍यामुळे दरवाजाची एक झडप कोसळली.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news