मिरजेत लग्नाचे आमिष दाखवून पायलटला 59 लाखांचा गंडा | पुढारी

मिरजेत लग्नाचे आमिष दाखवून पायलटला 59 लाखांचा गंडा

मिरज ; पुढारी वृत्तसेवा : नोएडामधील एका विवाहितेने लग्नाचे आमिष दाखवून येथील एका पायलटला 58 लाख 92 हजार रुपयाला (98 हजार 201 अमेरिकन डॉलर) गंडा घातला. याप्रकरणी पायलट अतिश शशिकांत शिंगे (रा. मिरज) यांनी विवाहितेविरुद्ध महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हना मोहसीन खान (रा. अ 31, सेक्टर 52, नोएडा 2131 उत्तर प्रदेश) असे संशयित महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मिरजेतील अतिश शिंगे हे एका विमान कंपनीत पायलट आहेत. त्यांची संशयित हना खान हिच्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. हना खान हिने अतिश यांना आपण विवाहित असून, पहिल्या पतीपासून घटस्फोट झाल्यानंतर तात्काळ लग्न करू, असे सांगितले. तसेच स्वत:लादेखील पायलट बनण्यासाठी अतिश यांच्याकडे पैशांची मागणी केली. पायलट झाल्यानंतर घेतलेली रक्कम जमिनीची विक्री करून परत देतो, असे सांगितले. तसे न झाल्यास जमीन अतिश यांच्या नावावर करण्याचे आश्वासन दिले. तसेच हना खान हिच्या वडिलांच्या नावावर असलेल्या जमिनीतून मिळणार्‍या 12 कोटी रक्कमेतील रक्कम देण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे अतिश यांनी हना खान हिच्या खात्यावर, तसेच अतिश यांच्या मिरज येथील राहते घर, मुंबई व मंगलोर या ठिकाणी वेळोवेळी 58 लाख 92 हजार रुपये दिले. ही रक्कम 98 हजार 201 अमेरिकन डॉलर स्वरुपात होती.

शिंगे यांनी काही कालावधीनंतर हना खान हिच्याकडे वारंवार पैशाची मागणी केली. परंतु हना खान हिने ते पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. हिना ही पैस परत न दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे अतिश यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी हना हिला याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यावेळी हना हिने अतिश यांच्या आईला फोन करून पोलिसात तक्रार करू नका, अन्यथा अतिश यांना खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. त्यानंतर अतिश यांनी महात्मा गांधी चौक पोलिसात फिर्याद दिली. याबाबत पोलिसांनी हना खान हिच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button