मुदाळतिट्टा; पुढारी वृत्तसेवा : श्री सदगुरू बाळुमामांच्या ५५ व्या समाधी दिनानिमित्त आदमापूरच्या नागरिकांसह भक्तगण मनोहर भोसले विरोधात एकवटले आहेत. बाळुमामांच्या नावाचा वापर करून मोठा झालेल्या मनोहर भोसले याचा विरोधात दंड थोपटले आहेत.
यावेळी बाळूमामांच्या कण्या, ताक, अमृत, प्रसाद घेऊन मनोहर भोसलेसह सर्वच भोंदू बाबांचा धिक्कार व निषेध करण्यात आला.
बाळुमामांचा भंडारा देऊन अंधश्रद्धा वाढीस लावणाऱ्या भोंदू बाबापासून सावध राहावे.
गैरमार्गाचा वापर करुन जर बाळूमामाच्या नावानं कोणीही देणगी मागत असेल तर त्यांना सहकार्य न करता नजीकच्या पोलिस ठाण्यात अशा भोंदूची तक्रार करा, असेही आवाहन करण्यात आले.
बाळूमामांचा ४ सप्टेंबर हा समाधी दिन आदमापूर (ता. भुदरगड) येथे आयोजित केला जातो.
येथील मरगुबाई मंदिर परिसरात आयोजित ताक, कण्या, महाप्रसाद वाटप प्रसंगी आयोजित सभेत हा निषेध करण्यात आला.
अध्यक्षस्थानी देवालय समितीचे अध्यक्ष धैर्यशील भोसले होते.
यावेळी सरपंच विजय गुरव यांनी मनोहर भोसले यांनी बाळुमामांच्या नावाचा वापर करुन आपला आर्थिक लाभ करुन घेतला.
वंशज, अवतार, शिष्य अशी नावे परिधान करुन भक्तांची दिशाभूल केली. भक्तांमध्ये चुकीचा संदेश देऊन नकळत अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचे काम केले.
भविष्यात असे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे भोंदू तयार होऊ नयेत याची जबाबदारी बाळूमामा भक्तांनी घ्यावी, असे आवाहन केले.
प्रा. एस. पी. पाटील, मच्छिंद्र टिंगरे, दिनकरराव कांबळे, दयानंद कोणीकेरी, सतीश जाधव, धनाजी पाटील, आनंदा पाटील , नामदेव पाटील यांनी आपल्या भाषणात मनोहर भोसले यांना लक्ष्य केले.
मनोहर भोसले यांनी पत्रकार परिषदेमधून केलेल्या स्पष्टीकरणाला चोख उत्तर दिले.
'बाळूमामांच्या नावाने चांगभलं' म्हणून बाळूमामांचा भंडारा लावून जर कोणी भक्ताला लुबाडायचा प्रयत्न करणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी दिला.
अशा भोंदू महाराजांना भक्तांनी थारा देऊ नये असे आवाहन केले.
ते पुढे म्हणाले, 'मनोहर भोसलेनी आदमापूर येथे भक्तांची संख्या कमी होईल, या भीतीपोटी तेथील ग्रामस्थ आपल्यावर आरोप करत आहेत असे सांगितले होते.
पंढरीचा पांडुरंग वारकरी संप्रदाय वाढत आहे. आदमापूर प्रति पंढरपूर होत आहे. याची जाणीव ठेवावी.
बाळुमामांची बकरी जशी फिरत पुढे जात आहेत.
तशी आदमापूर येथील बाळूमामांच्या भक्तांची संख्या वाढत आहे. मालिकेमुळे भक्तांची संख्या वाढत नाही, हे ध्यानात घ्यावे.
पंढरपूरला पालखी नेण्यासाठी आपल्याला देवस्थानने पत्र दिले असल्याचे ते सांगतात.
पण अशी मागणी करणाऱ्या भक्तांना परवानगी पत्रे दिली जातात. कोल्हापूर जिल्ह्यातून अनेक पालख्या जात आहेत. हे त्यांनी समजून घ्यावे.'
स्वागत प्रा. एन. एच. पाटील यांनी केले.
यावेळी बाळूमामा देवालय समितीचे कार्याध्यक्ष रामभाऊ मगदूम, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, दिनकरराव कांबळे,
एम. डी. पाटील ॲड. राजेंद्र देशमुख, संतोष देवकर प्रमुख उपस्थित होते
हेही वाचा :