नॉटिंगहॅम; वृत्तसंस्था : भारत- इंग्लंड यांच्यामधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होणार आहे. भारत- इंग्लंड कसोटी मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात असेल. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली असलेल्या भारतीय संघासमोर योग्य संघ निवडण्याचे आव्हान असेल.
कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या अंतिम संघाची घोषणा ही सामन्याच्या दोन दिवस अगोदर केली होती आणि त्यांच्यावर यासाठी टीकाही झाली होती. त्यामुळे बुधवारी संघाचे संयोजन करताना व्यवस्थापनाला खूप विचार करावा लागेल.
भारतीय संघाकडे दोन सलामी फलंदाज आहेत. रोहित शर्मा हा सक्षम सलामी फलंदाज आहे. मात्र, इंग्लंडच्या परिस्थितीत त्याने डावाची सुरुवात केलेली नाही.
दुसरा सलामी फलंदाज के. एल. राहुलही चांगला फलंदाज आहे; पण तोदेखील सुरुवातीला अडखळतो. राहुलने कसोटीत दोन हजारांहून अधिक धावा केल्या आहेत आणि मयंक अग्रवालच्या डोक्याला दुखापत झाल्याने राहुल हा सलामीचा पर्याय आहे.
याशिवाय संघाला हार्दिक पंड्याची कमतरता जाणवेल. बंगालच्या अभिमन्यू ईश्वरनला खेळण्याची संधी मिळते का याकडेदेखील लक्ष असेल. यासोबत हनुमा विहारीकडेदेखील नजरा असतील. विहारीची ऑफ स्पिनर गोलंदाजी आणि रविचंद्रन अश्विन संघात असल्याने शार्दुल ठाकूरला खेळण्याची संधी मिळू शकते.
मोहम्मद शमी आणि इशांत शर्मा भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करतील. जसप्रीत बुमराहलादेखील पहिल्या कसोटीत संधी मिळू शकते. मोहम्मद सिराजही संघात स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे.
स्थळ : ट्रेंट ब्रीज, नॉटिंगहॅम
वेळ : दुपारी 3.30 वाजता
प्रक्षेपण : सोनी टेन 1 आणि 3
हे ही वाचा :