इजिप्त मध्ये दोन हजार वर्षांपूर्वीच्या फळांच्या टोकरीचा शोध | पुढारी

इजिप्त मध्ये दोन हजार वर्षांपूर्वीच्या फळांच्या टोकरीचा शोध

कैरो : इजिप्त मध्ये किनारपट्टीवरील थोनिस हेराक्लिओनजवळील प्राचीनस्थळी इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकातील फळांनी भरलेल्या टोकरींचा शोध घेण्यात आला आहे. या टोकरींबरोबरच चिनी मातीच्या शेकडो प्राचीन कलाकृती आणि कांस्यच्या मूर्तीही सापडल्या आहेत.

इसवी सनाच्या दुसर्‍या शतकात शहरात आलेल्या भयानक पुरानंतर या टोकरींना कुणीही स्पर्श केलेला नाही. त्यानंतर इसवी सनाच्या आठव्या शतकात भूकंप आणि भरतीच्या लाटांमुळे संपूर्ण शहर बुडून गेले होते.

इजिप्त मध्ये फ्रँक गोड्डीओ यांनी फळांच्या या टोकरी शोधल्या आहेत. त्यांनी सांगितले की गेल्या दोन हजार वर्षांपासून या टोकरींना कुणीही स्पर्श केलेला नाही व त्या अतिशय अनोख्या आहेत. टोकरीत अद्यापही डौम नावाची आफ्रिकन फळे आहेत.

प्राचीन काळातील इजिप्शियन लोकांसाठी ही फळे पवित्र मानली जात होती. या टोकरीत द्राक्ष्यांची बीजेही आहेत. या टोकरींना तळघरांमध्ये ठेवले गेले असल्याने त्या अद्याप सुस्थितीत आहेत.

याठिकाणी आम्हाला थडग्यांवर बसवली जाणारी मोठी शिळाही मिळाली आहे. ती सुमारे 60 मीटर लांब आणि 8 मीटर रुंदीची आहे. इसवी सनापूर्वीच्या चौथ्या शतकात याठिकाणी ग्रीक व्यापारी आणि सैैनिक राहत होते.

Back to top button