कराड, पुढारी ऑनलाईन : करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांची सून आदिती यांनी आमदार पाटील यांच्यासह पती राजेश आणि नणंद टीना यांच्याविरोधात छळाची फिर्याद दिली. याप्रकरणी कराड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, आमच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेले सर्व आरोप तथ्यहीन आहेत. मुळात आदिती या गेल्या दोन वर्षांपासून माहेरीच आहेत. आम्ही वारंवार विनंती करूनही त्या सासरी आल्या नाहीत. आमचे घराणे राजकारणात आहे आणि आमची वर्तणूक समाजात सर्वश्रूत आहे. त्यामुळे हे आरोप हास्यास्पद आहेत, असे आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रकरणी आदिती राजेश पाटील (सध्या. रा. कराड) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. आदिती या सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी तर येथील ज्येष्ठ नेते सुभाष पाटील यांच्या कन्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुऴात खळबऴ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवीगाळ करून मारहाण करत एक कोटीची मागणी केली असल्याची फिर्याद आदिती यांनी दिली आहे. याप्रकरणी आदिती यांचे पती राजेश पांडुरंग पाटील, सासरे पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी एन. पाटील व नणंद टीना महेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत बोलताना आमदार पाटील म्हणाले, 'राजेश आणि आदिती यांचा आम्ही विवाह थाटात करून दिला होता. आम्ही सर्वजण आनंदात होतो. मात्र, या सगळ्याला आदितीने गालबोट लावले. गेल्या दोन वर्षांपासून त्या आम्हाला त्रास देत आहेत. त्या सहा सहा महिने माहेरी राहत होत्या. तसेच त्या आमच्या कुटुंबाशी मनमोकळ्यापणे राहिल्या नाहीत. परदेशात न सांगता जात होत्या. अलिकडे त्या माहेरीच होत्या. मे महिन्यात आम्हाला नोटीस आली. आम्ही काय त्रास दिला हे विचारले असता त्याबाबतही काही सांगितले नाही. त्यानंतर मी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाऊन भेटलो पण त्यांनीही त्यांच्या भाऊ आणि पुतणीला समजावण्यात असमर्थता दर्शविली. आम्ही आमच्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही आदिती या ऐकण्यास तयार नाहीत. त्यानंतर आम्ही वकिलांना पाठवून समजावून सांगितले. घटस्फोट हवा आहे का? असे विचारले असता त्यांनी त्यालाही नकार दिला. 'मला केवळ सासरच्या लोकांना त्रास द्यायचा आहे,' असे आदिती यांनी वकिलांना सांगितले. यावरून त्यांचा हेतू लक्षात येतो. आमच्या परीने प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यांना आमच्या कुटुबीयांना त्रासच द्यायचा असेल तर आता न्यायदेवता आम्हाला न्याय देईल.'
हेही वाचा :