सिंधुदुर्ग विमानतळाचे ( चिपी विमानतळ ) उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय वाहतुक हवाई मंत्री ज्योतिरादित्य शिंदे व महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी नवरात्रोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीचा म्हणजे ९ ऑक्टोबर २०२१ मुहूर्त ठरला आहे, अशी माहिती शिवसेनेचे संसदीय गटनेते, खासदार विनायक राऊत यांनी दिली. केंद्रीय लघु, मध्यम आणि सुक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग विमानतळाच्या उद्घाटनाचे धाडस करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
बहुचर्चित चिपी विमानतळ ७ ऑक्टोबर २०२१ पासून वाहतुकीस सुरू करू, असे पत्र अलायन्स एअर कंपनीने विमान वाहतूक मंत्रालयाला दिले होते. त्याबाबतची माहिती खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देवून दि. ७ ऑक्टोबरला विमान सुरू करण्याच्या दृष्टीने योग्य ती तयारी करण्याचे आदेश संबंधित अधिकार्यांना द्यावेत, अशी मागणी केली होती.
त्यानंतर खासदार राणे यांनी दिल्लीत मंगळवारी दि.७ सप्टेंबरला चिपी विमानतळ उद्घाटन दि. 9 ऑक्टोबरला केले जाईल, असे जाहीर केल्याने सिंधुदुर्ग विमानतळाचे उद्घाटन नेमके कधी होणार? ७ की ९ ऑक्टोबरला होणार? याबाबत उलटसुलट चर्चा रंगत होती.
बुधवारी कुडाळ एमआयडीसी येथे विनायक राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व केंद्रीय हवाई वाहतुक मंत्री शिंदे यांच्या चर्चेनंतर दि. ९ ऑक्टोबर २०२१ ही उद्घाटनाची तारीख निश्चित झाल्याचे जाहीर केले.
यावेळी आ. वैभव नाईक, माजी जि.प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, गटनेते नागेंद्र परब,अमरसेन सावंत, विकास कुडाळकर, राजन नाईक, अतुल बंगे,सचिन काळप, मंदार शिरसाट, बबन बोभाटे उपस्थित होते.
यावेळी राऊत म्हणाले की, चिपी विमानतळावरून विमानाचे उड्डाण कधी होते? याची सर्वांनाच प्रतिक्षा होती, पण आम्हा सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे खास करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी गेल्या दोन वर्षात चिपी विमानतळ संदर्भात ४ वेळा बैठका घेतल्या.
त्यामध्ये केंद्रीय विमान वाहतूक मंत्री गजपती राजू, सुरेश प्रभु आणि आताचे ज्योतिरादित्य शिंदे तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याबरोबर संपर्क साधला.
राऊत पुढे म्हणाले की, मी स्वतः गेली सात वर्ष या सर्व मंत्र्यांसह एव्हिएशन कन्सलटेटिव्ह कमिटीमध्ये हा मुद्दा सातत्याने लावून धरला होता. अखेर या सर्व प्रयत्नांना यश आल्याने सिंधुदुर्ग एअरपोर्ट वरून नियमित वाहतूक सुरू होण्याचे निश्चित झाले आहे.
'मंगळवारी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याशी चर्चा केली. दि. ९ ऑक्टोबर २०२१ हा दिवस उद्घाटनाचा निश्चित केला आहे. त्या दिवशी सकाळी १२ वाजता मुंबईहून टेक ऑफ केले विमान सिंधुदुर्ग विमानतळावर दुपारी १ वाजून १० मिनिटांनी उतरेल आणि पुन्हा १ वाजुन ३५ मिनिटांनी ते विमान मुंबईसाठी टेक ऑफ होईल.
१ तास १० मिनिटाचा हा प्रवास एअर अलायन्स या कंपनीच्या विमानातून होणार आहे. ७२ पॅसेंजरची क्षमता असलेले हे विमान दि. ६ सप्टेंबरलाच मुंबईत आलेले आहे.' असेही राऊत यांनी सांगितले.
राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे नाव न घेता 'आता जे बडेजाव मारतात मुख्यमंत्र्यांना उद्घाटनाला बोलवण्याची गरज नाही असे म्हणतात ते कोण? त्यांना अधिकार काय?' टीका केली.
'राणेंना जर काही माहिती नसेल, प्रोटोकॉल समजत नसेल तर त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहांकडून शिकून घ्यावे.' असा सल्लाही त्यांनी राणेंना दिला.
हेही वाचलं का ?