‘एकनाथ शिंदे’ यांच्या बंडामुळे अक्कलकुव्यात गुलाल उधळलाच नाही

‘एकनाथ शिंदे’ यांच्या बंडामुळे अक्कलकुव्यात गुलाल उधळलाच नाही
Published on
Updated on

नंदुरबार (योगेंद्र जोशी) : अत्यंत चुरशीत पार पडलेल्या महाराष्ट्राच्या विधानपरिषद निवडणुकीत लक्षवेधी विजय प्राप्त करणारे अक्कलकुवाचे नवनिर्वाचित आमदार आमशा पाडवी हे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घडवलेल्या राजकीय भूकंपामुळे मुंबईतच अडकून पडले असून त्यांच्या समर्थकांना आनंदाचा गुलाल उधळता आलेला नाही. मिरवणुकीसह संपूर्ण विजयाेत्सव त्यांना रद्द करावा लागला.

आदिवासीबहुल अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे विभाग प्रमुख आमशा पाडवी यांना शिवसेना पक्षाने नुसती उमेदवारी दिली नाही, तर कोट्यातील २६ मते मिळवून देत दिग्गजांच्या रांगेत बसवणारा विजय प्राप्त करून दिला. ते नंदुरबार जिल्हा शिवसेनेतील पहिले आमदार म्हटले जाणार आहेत. कारण नंदुरबार जिल्हा शिवसेनेतून आतापर्यंत विधानपरिषद किंवा विधानसभेत एकही आमदार निवडून गेलेला नव्हता.  राज्यपालांकडील यादी खोळंबली नसती तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे येथील शिवसेनेचे पहिले आमदार म्हटले गेले असते. आदिवासींना इतक्या उंचीवर संधी प्रथमच दिली गेली, म्हणून मी शिवसेना प्रमुखांचा आभारी आहे; अशा शब्दात नवनियुक्त आमदार आमशा पाडवी यांनी भावना व्यक्त केली होती. शिवसेनेच्या स्थापनेपासून ५६ वर्षांनंतर नंदुरबार येथील आदिवासी शिवसेना कार्यकर्त्याला आमदारकीची संधी देण्यात आली म्हणून देखील आमशा पाडवी यांचा विजय जिल्ह्यातील शिवसैनिकांना अत्यंत आनंदाची घटना वाटत होती. या निवडीमुळे नंदुरबार जिल्हा शिवसेनेची राजकीय शक्ती निश्चितच वाढेल, असेही म्हटले जात होते.

अशा सर्व संदर्भाने आमशा पाडवी यांच्या विजयाचा निकाल जाहीर होताच अक्कलकुवा येथे शिवसेना कार्यालयात बाहेर प्रचंड जल्लोष करण्यात आला. मुंबईतून पाडवी हे परत येतील तेव्हा सकाळी मिरवणूक काढून विजयोत्सव साजरा करावा असे नियोजन करण्यात आले. आतषबाजी करण्यासाठी फटाके उधळण्यासाठी गुलाल आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी हजारोंचा जमाव उपस्थित ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावल्यामुळे त्या सकाळी पाडवी यांना मुंबईतच थांबावे लागले. त्यांचा मुक्काम वाढल्यामुळे विजयोत्सव एक दिवस पुढे ढकलण्यात आला. तशातच शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी जो राजकीय भूकंप घडवला आणि मुंबईत सातत्याने ज्या बैठका चालू आहेत, त्यामुळे विजयी झालेले आमशा पाडवी हे मुंबईतच मुक्कामी अडकून पडले आहेत. अद्यापही ते परतलेले नाहित. त्यांच्याशी संपर्क साधला असता, राजकीय अस्थिरता संपेपर्यंत आम्हाला मुख्यमंत्र्यांसमवेत मुंबईत थांबावे लागणार आहे, असे आमशा पाडवी म्हणाले. दरम्यान विजयोत्सवाच्या आनंदावर विरजण पडल्यामुळे येथील कार्यकर्ते निराश झाले. आनंदाचा गुलाल त्यांना उधळता आलेला नाही. मिरवणुकीसह सर्व आयोजन रद्द करण्यात आले असल्याची माहिती पाडवी यांचे चिरंजीव शंकर पाडवी यांनी दिली.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news