आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाचे अपहरण नव्हे तर गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात

file photo
file photo
Published on
Updated on

पंचवटी; पुढारी वृत्तसेवा : नाशिकमधील संत आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाचे गुरुवारी (दि.२) दुपारी चौघा अनोळखी इसमांनी अपहरण केल्याची तक्रार दाखल करून घेत पंचवटी पोलिसांनी सुरू केलेल्या तपासातून शुक्रवारी (दि.३) वेगळेच वास्तव समोर आले. संबंधित संचालकाचे अपहरण झालेले नसून, त्याला गुजरातमधील अहमदाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात तब्बल १२ वर्षांपासून हा संशयित फरार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गंगापूर रोडवरील सावरकरनगर येथील संत आसाराम बापू आश्रमाचे संचालक संजीव किशनकिशोर वैद (४४ )हे आश्रमातील गायींना खाद्य खरेदी करण्याकरीता पिकअप (क्र. एम एच 48 टी 3096) हे वाहन घेऊन गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास पंचवटीत आले होते.

ते सेवाकुंज येथील नागसेठीया पशू खाद्य दुकानात आले असता त्यांना ४ अनोळखी इसमांनी त्यांना त्यांच्या राखाडी रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा या कारमध्ये बळजबरीने बसवून घेऊन गेले, अशी फिर्याद राजेश चंद्रकुमार डावर (42, रा. संत श्री आसारामजी बापू आश्रम, सावरकर नगर, गंगापूर रोड नाशिक) यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात दिली होती.

घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिताराम कोल्हे यांनी गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार व पथकाला आणि तपासी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक रोहित केदार यांना संशयितांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले. त्यांनी सदर गुन्ह्याचे घटनास्थळी लागलीच पथकासह भेट देऊन सदर गुन्ह्यातील येणार्‍या जाणार्‍या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

हत्येच्या प्रयत्नातील गुन्ह्यात बारा वर्षांपासून फरार

एका ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये चार इसम इनोवा क्रिस्टा वाहनातून घेऊन जात असल्याचे दिसले. या वाहनाचा शोध घेण्याकरता पोलिस निरीक्षक अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके बनवून सदर इनोवाचा शोध घेण्याकरिता घोटी तसेच शिंदे पळसे टोल नाका या ठिकाणी शोध घेण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

सीडीआरही तपासण्यात आले. तसेच, पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व पोलिस ठाण्यांनाही माहिती देण्यात आली. अखेर तपासादरम्यान सदर अपर्हत व्यक्ती गुजरातमधील अहमदाबाद येथील हत्येच्या प्रयत्नातील गुन्ह्यात बारा वर्षांपासून फरार होती व त्यास अहमदाबाद गुन्हे शाखेचे पथक नाशिकमधून घेऊन गेल्याचे पुढे आले.

यासंदर्भात वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांनी अहमदाबादच्या गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक देसाई यांच्याशी संपर्क करून खात्री केली असता त्यात तथ्य आढळले. स्थानिक पोलिसांना माहिती न दिल्याने अपहरणाची तक्रार समोर आल्याचे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले.

स्थानिक पोलिसांना माहिती न दिल्याने प्रकार

परराज्यातील पोलिस तपासाकामी आणि आरोपींना अटक करण्यासाठी अनेकदा शहरात येत असतात. मात्र, अनेकदा माहिती लिक होण्याचा धोका लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर पोलिसांना माहिती देणे टाळतात. त्यामुळे एखादी घटना घडल्यावर पोलिस थेट कारवाई करतात. आतादेखील संशयिताच्या अटकेनंतरच अपहरणनाट्य समोर आले.

हे ही वाचलत का :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news