

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भिक्षा मागण्याच्या बहाण्याने गल्लीबोळात फिरणार्या महिलांच्या टोळीने उत्तरेश्वर पेठेत घरात घुसून दोन मोबाईल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरुन या चोरीत लहान मुलाचा वापर केल्याचे दिसून आले. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
उत्तरेश्वर पेठेत राहणारे राकेश शिवाजी सुतार (वय २५) यांचा चांदी व्यवसाय आहे. शुक्रवारी सकाळी साडे आठच्या सुमारास त्यांच्या घरासमोर दोन महिला आल्या. एका महिलेच्या काखेत लहान बाळ होते. तर समोर एक लहान मुलगा पिशवी घेवून चालत होता. त्यातील लहान मुलगा अचानकपणे सुतार यांच्या घरात शिरला. त्याने घरातून बाहेर पडताना हात करत दोन असे हातवारे केल्याच्या संशयास्पद हालचाली फुटेजमध्ये दिसून येते.
सुतार यांच्या घरातून पंधरा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल चोरीस गेले असून याच महिलांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
हा व्हिडिओ सर्वत्र पाठविण्यात आला असून संशयितांना शोधण्याचे काम सुरू आहे.