पुणे : डेटींगचा फंडा अन् उच्चशिक्षीत व्यक्तीला 18 लाखाचा गंडा

पुणे : डेटींगचा फंडा अन् उच्चशिक्षीत व्यक्तीला 18 लाखाचा गंडा
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डेटींगसाईडचा मोह एका उच्चशिक्षित व्यक्तीला चांगलाच महागात पडला आहे. उच्चभ्रु तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून संबंधीत व्यक्तीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्यानंतर चोरट्यांनी एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल 18 लाख 37 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. फोटो व्हायरल करून पोलिसात तक्रार देण्याच्या धमकीने त्याच्याकडून वेळोवेळी पैसे उकळण्यात आले आहेत.

महिलांच्या क्लबमध्ये समावेश करुन सेक्शुअल प्रोव्हाईडर बनविण्याची संधी असल्याचे सांगून काही महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ व्यावसायिकाची सायबर चोरट्यांनी लाखो रुपयांची फसवणूक केली होती. हा प्रकार तसाच असल्याचे दिसून येते. या प्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा अनोळखी व्यक्तींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सिंहगड रोड परिसरातील 44 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे. हा प्रकार 29 मार्च ते 5 एप्रिल 2022 या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा सनसिटी रोडवरील एका चांगल्या सोसायटीत वास्तव्यास आहे. तो मुंबईतील एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीत मोठ्या पदावर नोकरीला आहे. त्याचे वडिल नुकतेच निवृत्त झाले आहेत. 29 मार्च रोजी सायंकाळी त्याला रिना नावाच्या महिलेचा फोन आला. तिने त्याला 'हॉर्नी डेट' या कंपनीत तुम्हाला सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईड मेंबरशीप देतो, असे सांगितले. त्यातून तुम्हाला अनेक महिलांबरोबर सहवास मिळेल. त्यांच्याकडून तुम्हाला पैसेही मिळतील, असे आमिष दाखविले.

विश्वासात घेत फेकले जाळे

सभासद होण्यासाठी तिने फिर्यादींकडून सुरूवातीला आठशे रुपये भरून घेतले. त्यानंतर रिनाने त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही तरुणींची छायाचित्रे पाठविली. त्यातील दोन तरुणींचे फोटो फिर्यादीने पसंत असल्याचे सांगितले. फिर्यादी हनीट्रॅपमध्ये अडकल्याची खात्री झाल्यानंतर आरोपींनी त्यांना वेगवेगळ्या मोबाईलवरुन फोन केले. वेगवेगळी कारणे सांगून, प्रोफाईल अपडेट करण्याच्या बहाण्याने त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरायला लावले. फिर्यादींनी देखील मोहात अडकून आरोपी सांगतील त्याप्रमाणे काही पैसे पाठवले. मात्र सतत पैशाची मागणी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी पैसे देण्यास नकार दिला.

त्यावेळी आरोपींनी फिर्यादींना ब्लॅकमेल करत, तुमचे सभांषण आमच्याकडे रेकॉर्ड आहे. तुमच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करू, तसेच तुमचे फोटो देखील आमच्याकडे आहेत ते व्हायरल करू अशी धमकी देऊन त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्यांनी वडिलांच्या पेन्शनचे आलेले पैसे असे एकूण 18 लाख 37 हजार 600 आरोपींच्या हवाली केले. मात्र त्यानंतर देखील पैसे मागण्याचा आणि धमकावण्याचा तगादा आरोपींचा सुरूच राहिला. शेवटी सतत होणार्‍या त्रासाला कंटाळून फिर्यादीने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. दाखल तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.

आंबटशौकीन अडकतात हनीट्रॅपच्या जाळ्यात

डेटींगच्या मोहातून जाळ्यात खेचल्यानंतर सायबर चोरटे नागरिकांना लाखोंचा गंडा घालात आहेत. दिवसेंदिवस शहरात अशा घटना वाढीस लागल्या आहेत. तरुण हनीट्रॅपमध्ये अडकत असल्याचे वास्तव असतानाच आता प्रौढ नागरिक देखील हनीट्रॅपची शिकार होत असल्याचे दिसून येते. गेल्या काही दिवसापुर्वी शहरातील एका जेष्ठ व्यक्तीला अशाप्रकारे लाखोंचा गंडा घालण्यात आला होता. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. गे डेटींग अ‍ॅपच्या माध्यमातून देखील आर्थिक लुट करण्यात आल्याचे प्रकार समोर आले आहेत. आंबटशौकीन प्रामुख्याने अशा टोळ्यांच्या रडावर असल्याचे दिसते.

'मोडस ओपरेंडी' लक्षात घ्या

याबाबत बोलताना सायबर तज्ञ अविराज मराठे सांगतात, आंबटशौकीन लोकांची संख्या डेटींगसाईटवर जास्त आहे. त्यामध्ये प्रायव्हसी असल्यामुळे अनेकजण आकर्षित होतात. सुरूवातीला खूप कमी पैशात मेंबरशीप दिली जाते. त्यानंतर अलगद सायबर चोरटे जाळे टाकतात. सायबर चोरटे महिलांच्या नावे बनावट खाते तयार करतात. हनीट्रॅपमध्ये अडकविण्यासाठी व्हिडीओ कॉलद्वारे संभाषणासाठी महिलांची नेमणूक करतात. एकदा का तुम्ही व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संभाषण करण्यास सुरूवात केली की, तुमचे रेकॉर्डींग करून ब्लॅकमेल केले जाते. त्यातूनच पुढे तुमचे फोटो व्हारल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जातात

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news