कोरोनाचा नवा XBB15 व्हॅरिएंट सर्वांत धोकादायक : तज्ज्ञाचा इशारा

कोरोनाचा नवा XBB15 व्हॅरिएंट सर्वांत धोकादायक : तज्ज्ञाचा इशारा

पुढारी ऑनलाईन : सध्या कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हॅरिएंटचा उपप्रकार असलेल्या BF.7ने चीनमध्ये हाहाकार उडवला आहे. BF.7ने जगाची चिंता वाढवली असतानाच XBB15 हा स्ट्रेन डोके वर काढू लागला आहे. रिकाँबिनन्ट प्रकारातील हा स्ट्रेन मोठी घटना आहे, असे साथरोग तज्ज्ञ एरिक फिगेल डिंग यांनी म्हटले आहे.

XBB15 म्हणजे काय?

XBB15 हा नवीन रिकाँबिनन्ट प्रकारातील स्ट्रेन आहे. रोगप्रतिकार क्षमतेला चकवा देण्याची आणि प्रादुर्भाव होण्याची क्षमता या व्हॅरिएंटची जास्त आहे. BQ आणि XBB या व्हॅरिएंटचा विचार करता XBB15चा फैलाव जास्त होतो, असे डिंग यांनी म्हटले आहे.

याला डेन यांनी सुपर व्हॅरिएंट म्हटले आहे. यामुळे अमेरिकेत रुग्ण संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.
डिंग म्हणाले, "विविध प्रारुपांचा अभ्यास केला तर XBB15ची आर व्हॅल्यू फार जास्त आहे. यापूर्वीच्या कोणत्याही व्हॅरिएंटपेक्षा फैलाव होण्याची क्षमता या स्ट्रेनची फार म्हणजे फारच जास्त आहे." BQ1 या व्हॅरिएंटशी तुलना करता XBB15 हा स्ट्रेन १२०% अधिक वेगाने पसरतो.

या स्ट्रेनची उत्पत्ती अमेरिकेत झाली असावी आणि स्ट्रेन रिकाँबिनेशन प्रकारातील असून जुन्या XBBशी तुलना करता हा स्ट्रेन ९६% जास्त वेगाने पसरतो. XBB15 न्यूयॉर्कमध्ये ऑक्टोबर महिन्यात दिसला होता.

ओमयक्रॉनचा प्रकार नाही

गेल्या काही महिन्यांत न्यूयॉर्कमध्ये कोरोनामुळे रुग्ण भरतीचे प्रमाण वाढले आहे, आणि हे प्रमाण कमी येण्याची चिन्हे दिसत नाहीत. XBB15 हा स्ट्रेन ओमायक्रॉन नाही. तो मिक्चर व्हॅरिएंट असून यात म्युटेशन झालेले आहेत.

XBB15 कसा वेगळा आहे?

१. रोगप्रतिकार शक्तीला चकवा देण्याची सर्वाधिक क्षमता
२. मानवी पेशींत प्रवेश करण्याची क्षमताही जास्त
३. XBB आणि BQ शी तुलना करता वेगाने फैलाव
४. ज्या ठिकाणी हा स्ट्रेन प्रभावी आहे, तिथे हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागण्याचे प्रमाणही जास्त आहे.

लसीचा उपयोग होणार का?

डिंग यांनी प्रश्नाचे ठोस उत्तर दिलेले नाही. ते म्हणतात, "BA2 या स्ट्रेनच्या रिकाँबिनेशनपासून XBB15 बनला आहे, त्यामुळे लसी किती प्रभावी ठरेल हे सांगता येत नाही."

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news