

पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनमध्ये कोरोनाने (China Covid) हाहाकार उडाला आहे. येथील मृतांचा आकडा वेगाने वाढत आहे. चीनमधील अनेक शहरांत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी एक आठवड्याचे वेटिंग सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी कोरोनाबाबत खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावरच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय इटलीने घेतला आहे. चीनमधून येणाऱ्या विमानांतील अर्ध्याहून अधिक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. नुकतेच चीनमधून आलेल्या दोन विमानातील अर्ध्याहून अधिक प्रवाशांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती इटलीच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
इटलीच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मिलान मालपेन्सा विमानतळावर आलेल्या एका विमानात ३८ टक्के आणि दुसऱ्या एका विमानातील ५२ टक्के प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. इटलीमध्ये २०२० मध्ये कोरोना परिस्थिती गंभीर बनली होती. त्यावेळी इटली हा युरोपमधील पहिला देश होता जिथे कोरोनाने हाहाकार उडाला होता. यामुळे येथील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला होता. या पार्श्वभूमीवर आता खबरदारी म्हणून इटली सरकारने विमानतळावरच आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य केली आहे.
दरम्यान, चीनमधील कोरोना संसर्गाच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील बायडेन प्रशासनाने बुधवारी जाहीर केले की, चीन, हाँगकाँग आणि मकाओ येथून येणाऱ्या प्रवाशांनी अमेरिकेत प्रवेश करण्यापूर्वी कोविड -१९ चाचणी निगेटिव्ह असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
चीनने कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल केल्यानंतर कोरोना देशभर वेगाने पसरत आहे. जर कोरोना निर्बंध शिथिल केले तर लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, अशी भिती चीन तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, चीनमध्ये २० दिवसांपेक्षाही कमी कालावधीत २५ कोटी लोकसंख्या कोरोना बाधित होऊ शकते. चीन सरकार कोरोनाचे खोटी आकडेवारी जारी करत आहे. पण सध्याची परिस्थिती भयानक आहे. कोरोना रुग्ण आणि मृतांची आकडेवारी लपवण्याचा चीनचा प्रयत्न सुरु आहे. चीनने कोरोनाचा दैनंदिन रिपोर्ट जारी करणे बंद केले आहे.
काही आंतरराष्ट्रीय आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, चीनमध्ये कोव्हिड निर्बंधाच्या विरोधात मोठी आंदोलने झाल्यानंतर येथील निर्बंध हटवण्यात आले. पण याचा परिणाम म्हणून कोरोना वेगाने पसरत आहे. त्यावर नियंत्रण आणणे कठीण बनले आहे. दिवसाला लाखो लोकांना संक्रमित होत आहेत.
चीनने अधिकृतपणे कोरोना मृतांची आकडेवारी खूप कमी दाखवत आहे. पण महामारीतज्ज्ञांचा असा दावा आहे की ही संख्या खूप जास्त आहे आणि आगामी नवीन वर्षात १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. (China Covid)
हे ही वाचा :