Covid19 | चीनसह पाच देशांतून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य | पुढारी

Covid19 | चीनसह पाच देशांतून येणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : चीन आणि शेजारील देशांत कोरोनाच्या (Covid19) वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना RT-PCR चाचणी अनिवार्य असेल. जर या देशांतून आलेल्या कोणत्याही प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यास अथवा त्यांची कोविड १९ साठी चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यास त्यांना क्वारंटाईन केले जाईल, असे मांडविया यांनी म्हटले आहे.

चीन, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग आणि थायलंड येथून येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या आरोग्याच्या सद्यस्थितीसाठी त्यांना हवाई सुविधा फॉर्म भरणे अनिवार्य केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (Covid19)

जगातील काही देशांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनास्थितीचा आढावा घेण्यासाठी तीन उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. कोरोनाचा संभावित लाट रोखण्यासाठी सर्वच पातळीवर सर्तक राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठकी घेतली. व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या बैठकीत राज्यांचे आरोग्यमंत्री उपस्थित राहिले होते.

बैठकीतून विविध राज्यातील कोरोना स्थितीचा आरोग्यमंत्र्यांनी आढावा घेतला. शिवाय कोरोना व्यवस्थापनाची तयारी पुर्ण करीत सर्तक राहण्याचा सल्ला मांडविया यांनी दिला होता. केंद्र तसेच राज्यांना एकत्रित काम करण्याच्या आवश्यकतेवर आरोग्यमंत्र्यांनी बैठकीतून भर दिला. कोरोना मॉनटरिंग यंत्रणा मजबूत करण्याच्या सूचना बैठकीतून देण्यात आल्या. यासोबत कोरोना तपासण्यांचे प्रमाण वाढवण्यासह रुग्णालयातील पायाभूत सुविधांना अधिक बळकट करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

चीनमध्ये कोरोनाच्या BF.7 या व्हेरियंटने मोठा हाहाकार उडाला आहे. दरम्यान, चीनमधील हॉस्पिटलमध्ये मृतांचा खच पडला असून अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या असल्याचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.

कोरोनाबाधितांच्या संख्येत किरकोळ वाढ

दरम्यान, देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे. शुक्रवारी दिवसभरात २०१ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, केरळमध्ये एक रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. दरम्यान सक्रिय कोरोना बाधितांच्या संख्येत १७ ने वाढ नोंदवण्यात आली आहे. शनिवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.८० टक्के आणि कोरोनामृत्यूदर १.१९ टक्क्यांवर स्थिर नोंदवण्यात आला. तर दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.१५ टक्के आणि आठवड्याचा कोरोना संसर्गदर ०.१४ टक्के नोंदवण्यात आला.

हे ही वाचा :

 

Back to top button