क्षयरोगाने ग्रस्त असलेले रुग्ण ओळखण्यासाठी प्राथिमक स्तरावर बुंक्री, एक्सरे, सोनोग्राफी केली जाते. पण आता खोकण्याच्या आवाजावरून क्षयरोग आहे की नाही याचे निदान करण्यात येणार आहे. राज्यात यावर अभ्यास सुरू झाला असून रायगड जिल्ह्यात एका स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रायोगिक तत्वावर याच्या चाचण्याही सुरू झाल्या आहेत. (World Tuberculosis Day 2024)
संबंधित बातम्या :
केंद्र शासनाने २०२५ पर्यंत क्षयरोगाचे पूर्णपणे उच्च्याटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याअंतर्गत अधिकाधिक क्षयरोगाचे रुग्ण शोधून त्यांना निरोगी बनवण्यावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाइल अॅप तयार केले आहे. त्याच्या मदतीने कृत्रिम बुध्दमतेच्या आधारावर 'सोल्यूशन टू डेटा प्रोग्राम' अंतर्गत त्याची चाचणी घेतली जात आहे. (World Tuberculosis Day 2024)
नवीन अॅपमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स लेन्स आहे. त्यामुळे खोकल्याच्या आवाजाच्या नमुन्याद्वारे क्षयरोग ओळखता येणार आहे. प्रथमदर्शी प्रकल्पांतर्गत देशभरातून खोकल्याच्या आवाजाचे नमुने गोळा केले जात आहेत. यामध्ये सक्रिय क्षयरोगाचे रुग्ण, त्यांचे कुटुंबिय आणि संपर्कातील लोकांचा समावेश असणार आहे. संशयित रुग्णाचा आवाज सात वेळा रेकॉर्ड केला जाणार आहे. प्रत्येकवेळी आवाज वेगळा असेल. ज्या लोकांचे आवाज रेकॉर्ड केले जातील त्यांची नावे आणि पत्ते गोपनीय ठेवले जातील.
नमुने घेताना प्रथम व्यक्तीची संमती घेतली जाईल. त्यानंतर अॅप सुरू होईल आणि ३० सेकंदांचा आवाज रेकॉर्ड केला जाईल. रुग्णाने एक ते १० पर्यतचे अंक मोजणे, काही शब्द बोलणे आणि तीन वेळा खोकण्याचा आवाज अशा प्रकारे सातवेळा रुग्णाचा आवाज रेकॉर्ड केला जाईल.
अॅपचा वापर केल्यास रुग्ण अणि त्याच्या कुटुंबियांना जास्तीत जास्त सुविधा मिळणार आहेत. यापूर्वी बहुतेक प्रकरणांमध्ये, क्षयरोगाच्या रुग्णाची प्रकृती गंभीर झाल्यानंतरच निदान होऊ शकत होते. त्यानंतर उपचार सुरू केले जात. त्यामुळे अनेकदा रुग्णाचा मृत्यू होत असे. मात्र नव्या पद्धतीमुळे क्षयरोगाचे निदान योग्यवेळेत होऊन रुग्णाला तात्काळ उपचार सुरू करता येतील.
राजस्थान, कर्नाटक, आंध्रप्रदेशसह अन्य राज्यात याबाबत चाचणी सुरू आहे. राज्यात युएसईए आणि नेएसडब्लू फाउंडेशन यांच्या सहकार्याने रायगड जिल्ह्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (Al) अॅपद्वारे क्षयरोग तपासणी सुरू आहे. यासाठी खोकला आणि आवाजाची तपासणी कशी करायची, याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
देशभरातील क्षयरोग पॉझिटिव्ह-निगेटिव्ह रुग्णांची सॅम्पल तपासली जात आहेत. ही सॅम्पल ऑडिओ इनपूट स्पेक्ट्रोग्राममध्ये रूपांतरित केली जातात. ती लक्षणात्मक डेटासह, एका न्यूरल नेटवर्कसाठी इनपूट म्हणून वापरली जातात. त्यातून एखाद्या व्यक्तीच्या क्षयरोगाच्या संभाव्यतेचा अंदाज घेतला जात आहे.
हेही वाचा :