रक्तातील साखर किती असावी हे घरच्याघरी, हव्या त्यावेळी मोजता यावी, यासाठी ग्लुकोमीटर हे अत्यंत उपयुक्त साधन आहे. ते प्रत्येक घरी असावे. या ग्लूकोमीटरचा अचूकपणा राखण्यासाठी काय करायला हवे?
संबंधित बातम्या
1) सर्व इलेक्ट्रॅानिक उपकरणे ही ठरावीक कालावधीत प्रमाणित करून घ्यायला हवीत. दर सहा महिन्यांनी लॅबमधे ब्लडटेस्ट करून घेताना ग्लूकोमीटर सोबत घ्यावा. रक्त काढल्यानंतर लगेच ग्लूकोमीटर वापरून रक्तातील साखर मोजावी. लॅब रिपोर्ट आणि ग्लूकोमीटर रिपोर्ट यामध्ये 10 टक्क्यांपेक्षा कमी फरक असावा. हा फरक जास्त असेल, तर ग्लूकोमीटर बनविणार्या कंपनीकडून तो कॅलिबरेट करून घ्यावा.
2) बर्याच ग्लूकोमीटरमध्ये एक न्यून असते. रक्तातील साखर खूप जास्त किंवा खूप कमी असेल, तर तर ग्लूकोमीटरची अचूकता कमी असते. या मर्यादा काय आहेत, हे मीटरसोबत जे माहितीपत्र असते त्यात दिलेले असते, ते लक्षात ठेवायला हवे.
3) ग्लूकोमीटर वापरताना बोटातून रक्ताचा थेंब मिळविण्यासाठी एक लॅन्सेट किंवा टोचणी असते. ती वापरणे हे सुरुवातीस जमत नाही. त्याचे ऑपरेशन समजून घेणे ही पहिली गरज असते. घरातील सगळ्यांना ही कला अवगत असायला हवी.
4) या टोचण्या प्रत्येकासाठी वेगळ्या हव्यात. अगदी एकाच माणसासाठी वापरल्या जात असतील, तरी त्या बदलायला हव्यात वरचेवर. त्या टोचण्या वापरून बोथट झाल्या, त्या वापरताना 'रक्त कमी आणि वेदना जास्त' बाहेर पडायला लागली की, मगच या बदलल्या जातात. हात स्वच्छ धुतलेले हवेत. बोटांवर राहिलेले साबण, पाणी किंवा बोट निर्जंतुक करण्यासाठी वापरलेले स्पिरीट यांमुळे रीडिंग चुकू शकते. त्यामुळे हात स्वच्छ आणि कोरडे हवेत. हात थंड पडले असतील, तरी रक्त मिळविण्यास त्रास होतो. हात उबदार असावेत.
5) बोटांतून रक्ताचा थेंब मिळविताना अगदी नखांसोबतचा भाग टाळावा. तो भाग जास्त वेदना देतो. बोटाच्या टोकाचा कडेचा भाग वापरावा. तिथे वेदना कमी होते.
6) लॅन्सेट किती खोलवर बोटात जावी, यासाठी लॅन्सेट प्लंजरवर लेव्हल्स दिलेल्या असतात. त्वचा पातळ असेल, तर पहिली लेव्हल पुरते. त्वचा जाड असेल, तर दोन किंवा तीन लेव्हल पुरतात. क्वचितप्रसंगी चार लेव्हल लागते.
7) लॅन्सेट टोचल्यानंतर रक्ताचा एक छोटासा थेंब यावा अशी अपेक्षा असते. रक्ताचा मोठा थेंब बाहेर पडून तो वाहू लागला, तर आपण प्लंजरवर जास्त लेव्हल वापरली, असे समजावे. नुसतीच टोचणी जाणवली पण रक्ताचा थेंब मिळविण्यासाठी बोट स्क्वीझ करावे लागले, तर प्लंजरची लेव्हल वाढवायला हवी किंवा लॅन्सेट बदलायला हवी.
8) ग्लूकोमीटरसाठी प्रत्यक्ष साखर मोजण्यासाठी लागतात त्या मेजरिंग स्ट्रिप्स. यावर रक्त धारण करण्याची जागा असते. हल्ली सर्व स्ट्रिप्सवर एक छोटीशी खाच असते. त्या खाचेचे टोक बोटावरील रक्ताच्या थेंबाला टेकवले की, कॅपिलरी अॅक्शन होऊन रक्त त्या खाचेत शिरते. तिथे ग्लूकोज मोजण्याची रासायनिक प्रक्रिया चालू होते. स्ट्रिपच्या दुसर्या टोकाला एक चिप असते. या चिपवर अनेक गोष्टी कोड केलेल्या असतात. ही स्ट्रिप मीटरमध्ये सरकवली की, मीटर ऑन होतेे. काही क्षणात ते रीडिंग घेण्यासाठी तयार होतेे. बहुतेक वेळा मीटरच्या डिस्प्लेवर आता रक्ताशी संपर्क येऊ दे हे दर्शविणारे चित्र किंवा शब्द येतात. असा 'गो अहेड' मिळाला की, मगच रक्त स्ट्रिपवर घ्यायचे असते. प्रत्येक मशीनच्या कुवतीप्रमाणे 5 ते 20 सेकंदांत मीटर रीडिंग घेऊन आपल्याला दाखवतो.
9) मोजण्याच्या या पायरीवर 'टाईम मॅनेजमेंट' करता यायला हवी. स्ट्रिपवर रक्त येउ द्या असा संदेश आला आणि त्यानंतर आपण लॅन्सेट वापरून रक्ताचा थेंब काढायला वेळ लावला, तर मीटर बंद होतो. स्ट्रिप बाहेर काढून पुन्हा इन्सर्ट करून मीटर तयार होईपर्यंत, रक्ताचा थेंब फुकट जातो. ही सर्व लय यायला मीटर वापरायच्या सुरुवातीच्या दिवसात रक्त आणि स्ट्रिप्स काही वेळा फुकट जातात.
10) या स्ट्रिपवर जी रासायने वापरलेली असतात, त्याला एक्स्पायरी डेट असते. स्टिरपवरील मॅग्नेटिक कोडवर ती डेट वाचण्याची सोय असते. मीटरमध्ये स्ट्रिप घातली आणि एक्सपायरी डेट उलटून गेली असेल, तर मीटर रीडिंग घ्यायला नकार देतो.
11) बरेचदा स्ट्रिप विकत घेतल्यानंतर त्या एक्स्पायरी डेटच्या आत संपवल्या नाहीत, तर त्या फुकट जातात.
12) ग्लूकोमीटर वापरण्याची सवय लागण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे विकत घेतलेल्या स्ट्रिप्स फुकट जात नाहीत. वरचेवर ग्लूकोमीटर वापरून साखरेचे प्रमाण नोंदवून ठेवले, तर उपचारांसाठी फायदा होतो. स्वत:च्या खाण्याच्या, व्यायामाच्या सवयींवर देखरेख राहून लाँग टर्म हेल्थ बेनेफिटस् मिळतात, हा बोनस फायदा.