World Blood Donor Day
World Blood Donor Day

World Blood Donor Day : ‘जागतिक रक्तदाता दिन’ १४ जून रोजी का साजरा केला जाताे? जाणून घ्‍या याचे महत्त्‍व

पुढारी ऑनलाईन डेस्क : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान मानलं जात. एका रक्तदात्यामुळे अनेकांना जीवनदान मिळते. त्याचबरोबर नियमितपणे रक्तदान केल्याने शरीरात नवीन रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते व रोगप्रतिकारशक्तीही वाढते. याच रक्तदात्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक स्तरावर रक्तदाता दिन साजरा केला जातो. आज जागतिक रक्तदाता दिन. दरवर्षी १४ जून रोजी हा दिवस जगभरात रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी हा दिन साजरा करण्यापाठीमागे एक पार्श्वभूमी आहे. जाणून घेवूया याविषयी… (World Blood Donor Day)

World Blood Donor Day
World Blood Donor Day

World Blood Donor Day : १४ जून रोजीच का साजरा केला जातो

शरीरविज्ञानात नोबेल पारितोषिक मिळविणारे प्रसिद्ध शास्त्रज्ञ कार्ल लँडस्टेनर यांनी मानवी रक्तात एग्ल्युटिनिनच्या अस्तित्वाच्या आधारे रक्ताचे ए, बी आणि ओ गटांमध्ये वर्गीकरण केले. कार्ल लँडस्टेनर यांच्या वर्गीकरणाने वैद्यकीय शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. या महत्त्वपूर्ण शोधासाठी कार्ल लँडस्टेनर यांना १९३० मध्ये नोबेल पुरस्‍कार देवून गाैरविण्‍यात आले हाेते. कार्ल लँडस्टेनर यांच्या रक्‍त संशाेधनातील योगदानाप्रती त्यांचा जन्मदिवस (जन्म १४ जून) हा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे  'जागतिक रक्तदाता दिन' साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचे उदिष्ट म्हणजे लोकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करणे आणि त्याच्याशी संबंधित गैरसमज दूर करणे हा आहे.

वैद्यकीय विज्ञानानूसार रक्तदान कोण करु शकतो?

  • कोणतीही निरोगी व्यक्ती ज्याचे वय १६ ते ६० वर्षांच्या दरम्यान आहे
  • ज्याचे वजन ४५ किलो पेक्षा जास्त आहे
  •  ज्याला एचआयव्ही, हेपेटायटिस बी किंवा हेपेटायटिस सी, रक्तदाबाचा त्रास, एड्स, कॅन्सर सारखे आजार झाले नसावेत
  • वर्षभरात कावीळ, मलेरिया, टायफॉईड सारखे आजार झालेले नसावेत.
  • जर तुम्ही कोविड प्रतिबंधात्मक लसचा दुसरा डोस घेतल्यास. त्या तारखेपासून २८ दिवसांनी रक्तदान करू शकतात.

रक्तदानाबाबत या गोष्टी माहित आहेत का?

  • रक्तदान करणे गरजेचे आहे. रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही.
  • रक्तदात्याची संपूर्ण तपासणी करुनच रक्त घेतले जाते.
  • आपल्या शरीरात ६ ते ७ लिटर रक्त असून त्यातील केवळ ३५० मि.लि. किंवा ४५० मि.लि. रक्त घेतले जाते.
  • रक्तदान केलेले रक्त ७ दिवसात नैसर्गिकरित्या भरुन येते.
  • रक्तदानास फक्त १० ते १५ मिनिटे लागतात.

"महिलांचे वजन कमी, ऍनिमिया, रक्तदानाबाबाबत असलेली महिती, त्याचबरोबर त्यांना त्यांच्या कामातून मिळत असलेला वेळ पाहता त्यांच्या रक्तदानाचे प्रमाण कमी आहे. काही वेळा महिलांची इच्छा असुनही त्यांच्यातील हिमोग्लोबीन कमी असल्याने रक्तदान करता येत नाही."

डॉ. ऋचा पिंपळघोटे, काेल्‍हापूर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथुन जानेवारी २०२३ ते मे २०२३ या दरम्यान ४४७० लोकांना रक्त देण्यात आले आहे. तर या कालावधीचा विचार करता पुरुषांच्या तुलनेत महिलांचे रक्तदान करण्याचे प्रमाण खूप कमी आहे. या पाच महिन्यात ४४७० रक्तदात्यांपैकी पैकी ३१९ महिला रक्तदाता आहेत.  ४४५१ पुरुषांनी रक्तदान केले आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news