गडहिंग्लज : हयातभर रक्तदानाची जागृती, मृत्यूनंतर नेत्रदान ! डॉ. अरुण हिडदुगी कुटुंबीयांचा आदर्श | पुढारी

गडहिंग्लज : हयातभर रक्तदानाची जागृती, मृत्यूनंतर नेत्रदान ! डॉ. अरुण हिडदुगी कुटुंबीयांचा आदर्श

गडहिंग्लज ; पुढारी वृत्तसेवा : येथील गांधीनगरातील डॉ. अरुण शंकराप्पा हिडदुगी (वय ७९) यांचे मरणोत्तर नेत्रदान झाले. गडहिंग्लज शहरातील हे पाचवे तर चळवळीतील ६६ वे नेत्रदान ठरले. आयुष्यभर रुग्णांची सेवा बजावलेल्या आणि रक्तदानासाठी प्रयत्नशील राहिलेल्या डॉ. हिडदुगी यांचे मरणोत्तर नेत्रदान करीत हिडदुगी कुटुंबीयांनी त्यांच्या कार्याला नवा आयाम दिला.

डॉ. अरुण हिडदुगी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. सुमारे ४५ वर्षे त्यांनी गडहिंग्लज शहरात रुग्णसेवा केली. येथील लायन्स ब्लड बँकेकडेही ते १५ वर्षे कार्यरत होते. रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासत असल्याने लोकांनी रक्तदान करावे यासाठी त्यांनी जागरुकता निर्माण करण्याचे काम केले. अजित क्रीडा मंडळाचे ते माजी फुटबॉल खेळाडू होते. आज (शुक्रवार) सकाळी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. हिडदुगी कुटुंबीयांनी त्यांच्या मरणोत्तर नेत्रदान करण्याचा निर्णय घेतला. येथील अंकुर सुपरस्पेशालिटी आय हॉस्पिटलच्या पथकाने नेत्रदानाची प्रक्रिया पार पाडली. डॉ. हिडदुगी यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

महिनाभरात सहावे नेत्रदान…

गडहिंग्लज, आजरा तालुक्यात सुरु असलेल्या नेत्रदान चळवळीचे काम कोरोनामुळे गेली दोन वर्षे ठप्पच होते. पुन्हा काम सुरु केल्यानंतर ६ जानेवारी रोजी पहिले नेत्रदान झाले होते. त्यानंतर आतापर्यंत महिनाभरातच सहा व्यक्तींचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. तर चळवळीत एकूण ६६ लोकांचे नेत्रदान झाले आहे.

Back to top button