Pune Crime news : नाटक आलं अंगलट! पत्नीने घेतले पेट्रोल ओतून, पतीने लावली काडी; पुण्यातील घटना

Crime
Crime
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दारू पिऊन घरी येऊन मारहाण करणार्‍या पतीला भीती दाखविण्यासाठी पत्नी अंगावर पेट्रोल ओतून घेऊन मी मरते आता, असे म्हणाली, त्या वेळी पतीने काडी ओढून तिला पेटवून दिले. ही घटना लोणी काळभोर परिसरातील वळती गावात घडली. याबाबत अमृता अक्षय कुंजीर (वय 23, रा. वळती, ता. हवेली) यांनी लोणीकाळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी अक्षय मारुती कुंजीर आणि आशा मारुती कुंजीर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार वळती गावातील फिर्यादीच्या घरी 12 सप्टेबर रोजी दुपारी 2 वाजता घडला.

फिर्यादी यांच्यावर सध्या ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. फिर्यादी आणि अक्षय कुंजीर यांचा 2020 मध्ये प्रेमविवाह झाला आहे. त्यांना एक मुलगा आहे. अक्षय हा वारंवार दारू पिऊन येऊन मारहाण करतो. 12 सप्टेंबरला तो असाच दारू पिऊन आला व घरातील सामानाची तोडफोड करीत होता. या वेळी तिची सासू व सासरे शेतात गेले होते. त्या वेळी अक्षय याने तू घरातून निघून जा, तू घरात राहायचे नाही,असे म्हणाला. त्यावर फिर्यादी मी मरून जाते, असे म्हणाल्या.

शेतीपंपासाठी आणलेल्या पंपामधील थोडे पेट्रोल त्याला भीती दाखविण्यासाठी अंगावर ओतले. त्या वेळी त्याने काडेपेटी आणून अंगावर टाकली. त्यामुळे त्या पेटल्या. त्यानंतर त्यानेच फिर्यादीच्या अंगावर पाणी ओतून विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत फिर्यादी यांची छाती, गळा व तोंडास गंभीर दुखापत झाली होती.

त्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल केले. तू जर तुला पतीने पेटविले, असे सांगितले तर दवाखान्यात उपचार करणार नाहीत, अशी भीती सासुने दाखविली. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला लोणी काळभोर पोलिसांना चुलीवर स्वयंपाक करताना अचानक पेट्रोल ओतल्याने भडका होऊन भाजले असे भीतीपोटी सांगितले होते. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, सुरुवातीला अमृता हिने असा जबाब दिला होता. मात्र, त्यानंतर तिने खरा प्रकार डॉक्टरांना सांगितले. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. अमृता हिची प्रकृती सध्या गंभीर असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता चव्हाण यांनी सांगितले. सहायक पोलिस निरीक्षक खोसे तपास करीत आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news