पुढारी ऑनलाईन डेस्क :
जगातील चौथ्या क्रमांकाचे बलाढ्य नौदल अशी आज भारतीय नौदलाची ओळख आहे. आज देशभरात नौसेना दिन ( Indian Navy Day) साजरा केला जात आहे. दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन का साजरा केला जातो याचा इतिहास जाणून घेवूया…
१९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध झाले. यावेळी भारतीय नौदलाने कराची येथे हल्ला केला. या ऑपरेशनचे नाव होते 'ऑपरेशन ट्रइडेंट'. हे ऑपरेशन ४ डिसेंबर १९७१ रोजी सुरु झाले. यावेळी मिळालेल्या ऐतिहासिक विजयामुळे दरवर्षी ४ डिसेंबर रोजी नौदल दिन ( Indian Navy Day ) म्हणून साजरा केला जातो.
भारत-पाकिस्तान युद्ध ३ डिसेंबर १९७१ रोजी सुरुवात झाली होती. पाकिस्तानने भारताच्या सीमेवर आणि हवाई क्षेत्रात हल्ला केला होता.
पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी यावेळी भारतीय नौदलाने 'ऑपरेशन ट्रइडेंट' हे ऑपरेशन राबवले. भारतीय नौलदाने थेट पाकिस्तान नौदलाच्या कराची येथील मुख्यालयावरच हल्ला केला.
भारतीय नौदलाने रात्रीच हल्ला करण्याचे नियोजन केले. कारण, त्यावेळी पाकिस्तानकडे रात्री हवाई हल्ले करु शकतील, अशी विमानेच नव्हती.भारतीय नौदलाने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तान नौदलाचे ५ जवान ठार झाले होते. तर ७०० हून अधिक जखमी झाले होते. भारतीय नौदलाने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले. या ऐतिहासिक विजयामुळे दरवर्षी ४ डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील समुद्री सीमांचे सुरक्षेबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध अधिक सद्ढ करण्यात भारतीय नौदलाचे अमूल्य असे योगदान आहे. आपल्या पराक्रमाने या दलाने नेहमीच प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावली आहे.