पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्गज, हरहुन्नरी अभिनेत्री स्मिता पाटीलला वेगळ्या ओळखीची गरज नाही. (Smita Patil Birth Anniversary) 'नमक हलाल,' 'निशान्त,' 'मंथन,' 'भूमिका', 'उंबरठा,' 'जैत रे जैत' अशा अनेक हिट चित्रपटांमधून स्मिताचे करिअर बहरले. 'भीगी पलके,' 'शक्ती,' 'बाजार,' 'अर्थ,' 'मंडी,' 'दर्द का रिश्ता,' 'आज की आवाज,' 'पेट,' 'प्यार और पाप,' 'दिलवाला,' 'अमृत,' 'आखिर क्यों,' 'अंगारे,' 'नजराना,' 'आवाम,' 'वारिस,' 'ठिकाना' यासारख्या चित्रपटांमध्ये स्मिताने उत्कृष्ट अभिनय केला. तर 'अर्धसत्य,' 'सद्गी,' 'तरंग,' 'गिध,' 'सुबह,' 'मिर्च मसाला' यांसारखे ऑफबीट चित्रपटसुध्दा आपल्या अभिनयाने अजरामर करून ठेवले. विशेष म्हणजे स्मिता आणि बॉलिवूडचे शहंशहा अमिताभ बच्चन यांची पडद्यावरील जोडी सर्वांच्याच पसंतीची होती. खासकरून नमक हलाल या चित्रपटातील तिच्या भूमिका आजही विसरता येत नाहीत. आज तिचा जन्मदिवस. या निमित्ताने नमक हलाल या चित्रपटातील तिच्या एका खास प्रसंगाविषयी जाणून घेऊया. (Smita Patil Birth Anniversary)
'नमक हलाल' चित्रपटातील एका गाण्याच्या शूटिंगनंतर सुंदर अभिनेत्री स्मिता पाटीलला अश्रू अनावर झाले होते. या चित्रपटातील एक गाणे पावसात शूट करायचे होते. 'आज रपट जाए तो' असे बोल असणार्या या गाण्यात स्मिताला महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत रोमँटिक सीन द्यायचे होते. हे सीन दिल्यानंतर स्मिता पाटील रात्रभर रडल्या होत्या.
१९८२ मध्ये रिलीज झालेला 'नमक हलाल' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्मिता पाटीलची मुख्य भूमिका होती. पावसात भिजत 'आज रपट जाए तो' या गाण्याचे शूटिंग करायचे होते. शूटिंग करत असताना स्मिताला अस्वस्थ वाटत होते. कारण, पावसामध्ये स्मिता पाटील यांना अमिताभ यांच्यासोबत अशी दृश्ये देणे सोपे नव्हते. चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींसाठी हे सहज असले तरी, स्मिता यांच्यासाठी हे कठीणच होतं.
अभिनेत्री स्मिता पाटील त्यावेळी साध्या भूमिका साकारत असे. 'नमक हलाल' हा चित्रपट व्यावसायिक होता. गाण्यात रोमँटिक सीन शूट करण्यास ती तयार नव्हती. त्यावेळी अमिताभ यांनी स्मिता यांना समजावलं होतं. त्यांनी स्मिताशी बराच वेळ बोलून समजूत काढली होती.
अमिताभ यांनी समजावल्यानंतरदेखील स्मिता रात्रभर रडल्या होत्या. माझ्याकडून काहीतरी चूक झाली आहे, असं त्यांना वाटत होतं. हीच गोष्ट मनात धरून त्या रडत राहिल्या.
स्मिता पाटील दुसर्या दिवशी सेटवर पोहोचल्या. त्यावेळी अमिताभ यांना लक्षात आले की, स्मिता रडल्या आहेत. परंतु, त्यावेळी स्मिता यांनी व्यावसायिक चित्रपट करायचं ठरवलं. 'नमक हलाल'नंतर स्मिता यांनी अमिताभ यांच्यासोबत 'शक्ती' चित्रपट केला होता.
एका मुलाखतीत बिग बी अमिताभ बच्चन म्हणाले होते की, 'कुली चित्रपटाच्या सेटवरच्या माझा अपघाताचा पूर्वाभास स्मिताजींना झाला होता. अपघाताच्या आधी एका रात्री मला स्मिता पाटील यांचा फोन आला होता. त्यांनी माझ्या तब्येतीबद्दल विचारले. मी म्हणालो, माझी तब्येत ठिक आहे. त्यावेळी फोनवर स्मिता घाबरलेल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं की, मी एक भयानक स्वप्न पाहिलयं, जे तुमच्याबद्दल होतं. म्हणून मी तब्येत विचारण्यासाठी फोन केला. एका दिवसानंतर कुली चित्रपटाच्या सेटवर माझा अपघात झाला.'
अशी बॉन्डिंग स्मिता आणि अमिताभ यांची होती. आजही या जोडीला पसंत केले जाते.