नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या नदीचा शासनाला विसर

नाशिक : देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या नदीचा शासनाला विसर
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील तब्बल 75 नद्या अमृतवाहिनी करण्यासाठी 'चला जाणू या नदीला' हा महत्त्वाकांक्षी नदीयात्रा उपक्रम राज्य सरकारने हाती घेतला आहे. गांधी जयंती (दि. 2 ऑक्टोबर) ला प्रारंभ झालेल्या या नदीयात्रा उपक्रमातून देशातील दुसर्‍या क्रमांकाच्या असलेल्या गोदावरी नदीलाच वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राज्यातील गोदावरी, कृष्णा, तापी, नर्मदा तसेच पश्चिम वाहिन्यांच्या खोर्‍यातील नद्या उगम ते संगम अमृतवाहिनी करण्यासाठी 'चला जाणू या नदीला' या उपक्रमांतर्गत नद्यांची परिक्रमा केली जाणार होती. नदी अभ्यासक, नदीप्रेमी, शेतकरी, विद्यार्थी, नदीचे स्टेक होल्डर, सरकारी यंत्रणांमधील अधिकारी यांचा सहभाग राहणार आहे. प्रत्येक नदीच्या यात्रेवेळी किमान 100 जणांचा सहभाग असावा, असा प्रयत्न केला जाणार आहे. महाराष्ट्राला वारंवार भेडसावणार्‍या पूर आणि दुष्काळ या समस्यांपासून मुक्तीसाठी नदी संवाद अभियानाचे आयोजन करणे, अभियानांतर्गत जनसामान्यांना नदीसाक्षर करणे, अमृतवाहिनी करण्यासाठी मसुदा तयार करणे, नदीचे स्वास्थ्य आणि मानवी आरोग्य याबाबत प्रचार व प्रसार करणे, नदीचा तट आणि प्रवाह जैवविविधतेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रचार, प्रसार व नियोजन करणे, नदीच्या पाणलोट क्षेत्राचा अभ्यास करून त्यावर संबंधितांना कार्यवाहीसाठी अहवाल सादर करणे, पावसाचे पाणी अडवून भूजल स्तर उंचावणे, अतिक्रमण तसेच शोषण आणि प्रदूषण या तीन कारणांचा अभ्यास करणे आदी हेतू समोर ठेवून या उपक्रमाची आखणी केली गेली.

मात्र, या उपक्रमातून देशातील दुसर्‍या आणि महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या गोदावरी नदीलाच वगळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जेव्हा या उपक्रमाची आखणी केली गेली, तेव्हा राज्य सरकारने याबाबत काढलेल्या अध्यादेशात गोदावरीचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. आता अचानक नाव वगळले गेल्याने, या उपक्रमासाठी नेमण्यात आलेले समन्वयकही बुचकळ्यात पडले आहे. गोदावरी नदीशिवाय हा उपक्रम पूर्ण होऊच शकणार नाही, अशा भावनाही अनेकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. तसेच गोदावरीच्या संवर्धनासाठी शासनाने या उपक्रमात गोदावरीला अग्रस्थान देण्याची गरज असल्याची मागणीही यानिमित्ताने पुढे येत आहे.

नाशिकमधील या नद्यांचा समावेश
'चला जाणू या नदीला' या उपक्रमात नाशिक जिल्ह्यातील नंदिनी, कपिला, वरुणा, वालदेवी, अगस्ती व मोती या नद्यांचा समावेश असणार आहे. मात्र, नाशिकमधील मुख्य नदी असलेल्या तसेच दर 12 वर्षांनी याच नदीच्या तीरावर कुंभमेळा भरणार्‍या गोदावरीचे नाव मात्र उपक्रमातून वगळण्यात आले आहे.

'चला जाणू या नदीला' या उपक्रमात गोदावरी नदीचे नाव प्राधान्याने असून, नजरचुकीने ते राहिले गेले आहे. त्यामुळे नाव वगळले असे काही म्हणता येणार नाही.
– चिन्मय उदगीरकर, ब—ॅण्ड अ‍ॅम्बेसेडर, जलबिरादरी

देशातील गंगा नदीनंतर दुसर्‍या क्रमांकावरील व महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाची तसेच सात राज्यांतून 1,465 किलोमीटर वाहणारी गोदावरी नदी. ज्या नदीवर दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये कुंभमेळा होतो, याच पवित्र नदीला शासनाच्या अधिकृत नदीयात्रा उपक्रमाच्या यादीतून वगळण्यात आले, ही बाब दुर्दैवी आहे. गोदावरी नदीसोबत गेल्या 15 वर्षांपासून काम करणारा कार्यकर्ता म्हणून प्रशासनाच्या या कृतीचा मी जाहीर निषेध करतो.
– निशिकांत पगारे, अध्यक्ष, गोदावरी गटारीकरण विरोधी मंच

नव्या अध्यादेशात गोदावरी खोरे असा उल्लेख आला असल्याने गोदावरी नदीचा उल्लेख येतोच. अशातही लवकरच काढण्यात येणार्‍या सुधारित अध्यादेशात गोदावरीचा स्पष्ट उल्लेख केला जाणार आहे. नद्या म्हणजे अमृत असून, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त नद्या प्रदूषणमुक्त करून आपली संस्कृती रुजविण्याचा या उपक्रमातून प्रयत्न असणार आहे. त्यामुळे उगाचच कोणी यावरून गैरसमज पसरवू नये.
– राजेश पंडित, समन्वयक, चला जाणू या नदीला

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news