Anger Effects : तुम्हाला खूप राग येतो का? जाणून घ्‍या रागाचे शरीरावर हाेणारे भयंकर परिणाम | पुढारी

Anger Effects : तुम्हाला खूप राग येतो का? जाणून घ्‍या रागाचे शरीरावर हाेणारे भयंकर परिणाम

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपले मानसिक आरोग्य हे शरीरावर परिणाम करत असते. चांगले विचार, चांगली कृती आणि चांगले आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध आहे. काहीतरी चांगले करण्याचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्‍या शरीरावरही त्‍याचा सकारात्‍मक परिणाम हाेताे. त्‍यामुळे तुमच्‍या स्‍वभावाचा आराेग्‍यावर थेट परिणाम हाेत असताे.  तुम्‍हाला पटकन काेणत्‍याही गोष्टींवरुन राग येत असेल तर लवकरच सावध व्‍हा. कारण त्‍याचे शरीरावर भयंकर परिणाम हाेतात. काही काळासाठी येणारा राग हेच अर्ध्या आजारांचे मूळ (Anger Effects)ठरते.

रागामुळे शरीरातील अंतर्गत कार्यामध्ये देखील बिघाड होतो आणि वेगवेगळे आजार शरीरात घर करू लागतात. माणसाला ज्यावेळी राग येतो त्यावेळी हृदयाच्या ठोक्यांचा वेग वाढतो. सतत चिडचिड करत असाल तर हृदयाचा वेग अधिक वाढून हृदयाचा झटका येऊ शकतो. राग आल्यानंतर स्वतःच्या शरीराचे निरीक्षण केल्यास ते आपल्याला थरथरलेले जाणवते. हृदयाची गतीही वाढलेली दिसते. म्हणूनच राग येण्यापूर्वीच जाणून घ्या, रागाचा आपल्‍या शरीरावर नेमका कसा परिणाम हाेताे याविषयी…  भयंकर

Anger Effects:  रागाचे शरीरावर हाेणारे परिणाम

निद्रानाश: ज्यावेळी व्यक्‍ती रागात असते त्यावेळी शरीरातील अंतःस्रावी ग्रंथींमध्ये मोठी उलथापालथ होऊ लागते. त्यांच्या कार्यात अनियमितता आल्याने, ज्या व्यक्‍ती लवकर संतापतात त्यांना निद्रा नाशाची तक्रार जाणवू लागते. झोप न लागल्याने आणखी अनेक शारिरीक आणि मानसिक आजार हाेण्‍याची शक्‍यता असते.

उच्च रक्‍तदाब: उच्च रक्‍तदाब हा आजार तसे पाहिले तर अनेक कारणांमुळे होतो. मात्र, अधिक रागावल्यामुळे रक्‍तदाब वाढतो आणि रक्‍तदाब वाढल्याचा थेट परिणाम हा हृदयावर होतो. त्यामुळे उच्च रक्‍तदाबाची समस्या उद्भवते. काहीवेळा ही परिस्थिती गंभीर ह्दयरोगाची समस्या देखील निर्माण करू शकते.

श्‍वास घेण्यास अडथळा: ज्या व्यक्‍तींना अस्थम्यासारख्या श्‍वसनाशी संबंधित आजारांचा त्रास आहे त्यांना संताप केल्यानंतर श्‍वास घ्यायला अडचण येऊ लागते. खूप धाप लागते. ही धाप वाढत गेली तर ती व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते.

डोकेदुखी: ज्यावेळी आपण रागावतो तेव्हा रक्‍तवाहिन्या वेगाने काम करू लागतात. त्यामुळे डोक्यात वेदना निर्माण होतात. राग आल्यानंतर जर डोक्यात वेदना सुरू झाल्या तर अशावेळी आपण त्वरित शांत झाले पाहिजे. नाहीतर रक्तामधील प्रेशर वाढून डोक्यात रक्तस्त्राव होऊ शकतो. याचा परिणाम अर्धांगवायू होण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो.

रोगप्रतिकारशक्ती कमी होते: अभ्यासातून असे दिसून आले आहे की, व्यक्तीमध्ये सातत्याने तणाव किंवा रागाच्या संवेदना निर्माण होत असतील तर त्या व्यक्तीमधील रोगप्रतिकारकशक्ती ही लक्षणीयरीत्या कमी किंवा असंतुलित होऊ शकते.

पचनसंस्था बिघडते: अत्यंत राग निरोगी पचनासाठी आवश्यक असलेली रसायने स्रवण्यास प्रतिबंध करते. तीव्र रागामुळे पोटातील ऍसिडस् देखील बाहेर पडतात ज्यामुळे अल्सरला त्रास होतो. रागामुळे अतिसार, बद्धकोष्ठता आणि पोटदुखी या समस्या उद्भवतात.
याव्यतिरिक्‍त इतरही बरेच त्रास निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून योग्य वेळी रागावर नियंत्रण राखणे गरजेचे असते.

रागावर कसे नियंत्रण मिळवाल?

काही क्षणाचा राग कधीकधी व्‍यक्‍तीचे आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त करु शकते. कारण राग हा व्‍यक्‍त करणार्‍या व्‍यक्‍तीच्‍या आरोग्‍यासाठी हानीकारक असतोच त्‍याचबरोबर त्‍याच्‍या सहवासात असणार्‍या प्रत्‍येकासाठीही तो तितकाच घातक ठरतो. त्‍यामुळे रागावर नियंत्रण कसे मिळवावे हेही जाणून घेणे महत्त्‍वावे ठरते.

रागावर नियंत्रण करण्‍याची पहिली पायरी म्‍हणजे, तुम्‍हाला कशाचा राग येतो आणि तुम्‍हाला राग येणार आहे हे ओळखायला शिकणे. राग येणार आहे हे ओळखायला शिकणेच तुम्‍हाला रागावर नियंत्रण मिळविण्‍यासाठी फार उपयोगी ठरते. कारण राग येणार हे माहिती झाल्‍यानंतरच तुम्‍ही रागावर नियंत्रण ठेवू शकता.

तुम्‍हाला एखाद्‍या गोष्‍टीचा राग आला तर १ ते १०पर्यंत अंक मोजा आणि दीर्घश्‍वसन करा. तुम्‍हाला हे वाचायला मजेशीर वाटेल;पण हा उपाय खूपच फायदेशीर ठरतो. दीर्घ श्‍वसन म्‍हणजे संथ श्‍वसन. यामुळे मन शांत होण्‍यास खूपच मदत होते.

राग आल्‍यावर त्‍या क्षणी प्रतिक्रिया देणे टाळा, पहिल्‍या पायरीत तुम्‍ही कशामुळे राग येतो हे तपासले. त्‍यामुळे तुम्‍ही
स्‍व:निरीक्षकच झालेला असता. एखाद्‍या भावनेकडे तटस्‍थपणे पाहणे म्‍हणजेच ध्‍यान. ध्‍यान म्‍हणजे रस्‍त्‍याच्‍या कडेला बसून गाड्या जाताना पाहण्‍यासारखे आहे. असे समजा की, राग हा एक कार सारखाच आहे. तुम्‍ही त्‍याकडे केवळ पाहाता, तुम्‍ही
त्‍याचा रंग, वेग आणि रचना लक्षात येते. पण तुम्‍ही या कारला थांबवतही नाही आणि त्‍यामध्‍ये बसतही नाही. फक्‍त कार पाहता. असे करण्‍यासाठी तुम्‍हाला या ध्‍यानाचा सराव करावा लागेल. दिवसभरात काही वेळा तुम्‍हाला राग येईल. त्‍यावेळी रागवू नका, त्‍याचे निरीक्षण करा. काही दिवसांमध्‍येच तुम्‍ही रागावर नियंत्रण मिळवू शकता, हे निदर्शनास येईल.

Anger Effects : तुमचा राग समजून घ्‍या…

तुम्‍हाला नेमका कशाचा राग येतो हे तपासा. मनाविरुद्‍ध गोष्‍टी घडल्‍या की तुम्‍ही संतापता. मनातील प्रत्‍येक भावनेचा एक उद्देश असतो. रागाचा उद्देश तुम्हाला सावध करणे हा आहे. तुमच्‍या अपूर्ण गरजा कोणत्‍या आहेत ते तपासा. कारण राग हा अपूर्ण गरजांमधूनच व्‍यक्‍त होत असतो. एखादी व्‍यक्‍ती वा परिस्‍थिती याविरोधात व्‍यक्‍त होण्‍यासाठी राग तुम्‍हाला येत असतो. त्‍या क्षणी राग समजून घ्‍या. काही वेळातच तुमचा राग निघून जाईल. या टीप्‍सचा वापर करुन तुम्‍ही रागावर नियंत्रण आणण्‍याचा प्रयत्‍न करु शकता. या सोप्‍या टीप्‍सचा वापर करुन रागावर नियंत्रण मिळवत स्‍वत:सह इतरांचीही काळजी घेवूया.

हेही वाचा:

Back to top button