पुढारी ऑनलाईन डेस्क :
आजही पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वासीम अक्रम ( Wasim Akram ) याच्या नावाचा उल्लेख झाला तरी त्याचा 'यॉर्कर' आणि अफलातून स्विंग याचे सर्वांना स्मरण होते. वासीमच्या भेदक यॉर्करला तोंड देताना भल्याभल्या त्याच्या समकालीन फलंदाजांची दांडी गूल झाली होती. नुकताच एका चॅरिटी सामन्यासाठी वासीम मैदानावर उतरला. यावेळी आपल्या अप्रितिम यॉर्करने त्याने इंग्लंडच्या माजी कर्णधाराला क्लिन बोल्ड केले. १९ वर्षांनंतर अक्रमने आपल्या गोलंदाजीतील धार कायम असल्याचे दाखवून दिल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दिवगंत क्रिकेटपटू शेन वार्न यांच्या स्मरणार्थ एका चॅरिटी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामन्यात अक्रमने अशी गोलंदाजी केली की, जुन्या दिवसांना उजाळाला मिळाला. या सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल अर्थटन फलंदाजीला आला. यावेळी याला अक्रमच्या यॉर्करने चकवा दिला. तो क्लिन बोल्ड झाला. यानंतर अक्रमने आपल्या जुन्या अंदाजाप्रमाणेच जल्लोष करत प्रेक्षकांची मने जिंकली.
वसीम अक्रमे पाकिस्तानसाठी १०४ कसोटी सामने, ३५६ वनडे सामने खेळले. यामध्ये त्याने कसोटीत ४१४ तर वनडे मध्ये ५०२ विकेट घेतल्या आहेत. स्विंगचा सुल्तान अशीही त्याची ओळख होती. समकालीन फलंदाजांना त्याने आपल्या स्विंगने हैराण केले होते. अक्रमने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २००३ मध्ये खेळला होता. निवृत्त झाल्यानंतर १९ वर्षानंतरही त्याने आपली गोलंदाजीची धार कायम असल्याचे चॅरिटी सामन्यात दिसले. प्रेक्षकांनही अक्रमच्या गोलंदाजीला भरभरुन प्रतिसाद दिला.
हेही वाचा :