पुढारी ऑनलाईन डेस्क : 2022 च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीआधीच (Presidential election) विरोधी पक्षांना एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. शरद पवार आणि फारुख अब्दुल्ला या दोन नेत्यांनी विरोधकांतर्फे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास नकार दिला. त्यानंतर आता महात्मा गांधींचे नातू गोपाळ कृष्ण गांधी यांनीही या राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास नकार कळवला आहे. त्यांनी आपले नाव सुचवल्याबद्दल विरोधी पक्षनेत्यांचे आभार मानले आहेत, तसेच निवडणूक न लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (Gopalkrishna Gandhi says no to Opposition s request to contest Presidential election)
वृत्तानुसार, काही विरोधी नेत्यांनी गोपाल कृष्ण गांधी यांच्याशी फोनवर बोलून त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनण्याची ऑफर दिली होती. यापूर्वी 2017 मध्येही विरोधकांनी त्यांना व्यंकय्या नायडू यांच्या विरोधात उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनवले होते, मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. गोपाळ कृष्ण गांधी यांनी 2004 ते 2009 या काळात पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले आहे. एवढेच नाही त्यांनी आफ्रिका आणि श्रीलंकेत भारतीय उच्चायुक्त म्हणूनही काम केले आहे. (Gopalkrishna Gandhi says no to Opposition s request to contest Presidential election)
राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत विरोधकांमध्ये आतापर्यंत एकमत झालेले नाही. गेल्या आठवड्यात ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावर दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली होती. यामध्ये काँग्रेससह 17 पक्षांचे नेते सहभागी झाले होते. बैठकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा प्रस्ताव काही नेत्यांनी ठेवला होता, मात्र सक्रिय राजकारणात कार्यरत राहणार असल्याचे कारण देत पवारांनी ही ऑफर नाकारली. त्यांच्याशिवाय फारुख अब्दुल्ला यांनीही विरोधकांचा उमेदवार म्हणून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यास नकार दिला होता. या घडामोडीनंतर विरोधकांनी गोपाळ कृष्ण गांधी यांचे नाव पुढे आणले. (Gopalkrishna Gandhi says no to Opposition s request to contest Presidential election)
विरोधकांडून गांधींच्या नावावर चर्चा झाली आणि त्यांना उमेदवारी देण्याचे ठरले. मात्र गांधींनी विरोधकांना धक्का दिला. तुम्हाला आणखी चांगला उमेदवार मिळेल असे म्हणत त्यांनी उमेदवारी नाकारली. त्यांच्या या नकारामुळे विरोधक पुन्हा गोंधळात पडल्याचे चित्र आहे. ते आता पुन्हा नवा चेहरा शोधतील की उमेदवाराअभावी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या शर्यतीतूनच थेट माघार घेतील याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत विरोधकांची बैठक बोलावली आहे. या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.