नाशिक : पुढारी वृत्तसेवा
बदलत्या वातावरणाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला असून, व्हायरल तापाच्या साथीने नाशिक शहरात अक्षरश: थैमान घातले आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्येच गेल्या आठवडाभरात तापसदृश आजाराच्या दोन हजारांवर रुग्णांनी उपचार घेतले असून, खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या व्हायरल फीव्हरच्या रुग्णांची संख्या किती तरी पटीने अधिक आहे.
पावसाळा आला की नाशिककरांवर आता डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या आजारांबरोबरच तापसदृश आजाराचेही संकट कोसळते आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर ठिकठिकाणी साचणाऱ्या पाण्याच्या डबक्यांमध्ये निर्माण होणाऱ्या डासांमुळे विविध आजारांना निमंत्रण मिळाले आहे. यंदा पाऊस कमी असतानाही डेंग्यू, मलेरिया सारख्या कीटकजन्य आजारांचा प्रादुर्भाव शहरात वाढू लागला आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारली होती. परंतु, पाऊस नसल्यामुळे इतर आजारांपेक्षा डोळ्याच्या साथीच्या आजाराने धुमाकूळ घातला होता. तर पाऊस नसतानाही डेंग्यूचा प्रकोप सुरूच होता. आता तर केवळ दोन दिवसांच्या पावसाळी वातावरणाचा थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. व्हायरल तापाने नाशिकमध्ये थैमान घातले आहे. हे आजार हवेतून पसरणारा 'व्हायरल' स्वरूपाचा असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये दररोज दोनशे ते सव्वादोनशे रुग्ण तापाचे तपासणीसाठी येत आहेत. गेल्या दहा दिवसांमध्ये तापसदृश आजाराच्या २०४७ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात तापसदृश आजाराचे पाच हजार रुग्णांची पालिकेच्या दफ्तरी नोंद झाली आहे. तर खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तापसदृश आजाराच्या रुग्णांचा आकडा यापेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. सप्टेंबरच्या गेल्या दहा दिवसांतच डेंग्यूचे ५० नवे रुग्ण आढळले आहेत. तर, चिकुनगुणियाचा एकही नवा रुग्ण अद्याप आढळून आलेला नाही.
नागरिकांमध्ये दहशत
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, खोकला येणे अशी या व्हायरल फीव्हरची लक्षणे आहेत. कुटुंबातील एका सदस्याला या आजाराची लागण झाल्यानंतर अवघ्या आठवडाभरात संपूर्ण कुटुंबच या आजाराने ग्रस्त होत असल्यामुळे नाशिककरांमध्ये या आजाराने दहशत माजविली आहे.
हेही वाचा :