अजित पवारांचा फडणवीसांना ‘शॉक’, ऊर्जामंत्र्यांच्या परस्पर घेतली ऊर्जा खात्याची बैठक | पुढारी

अजित पवारांचा फडणवीसांना ‘शॉक’, ऊर्जामंत्र्यांच्या परस्पर घेतली ऊर्जा खात्याची बैठक

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याची बैठक घेतल्यावरून शिवसेनेतून नाराजीचा सूर निघत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘शॉक’ दिला आहे. फडणवीस यांच्याकडील ऊर्जा खात्याची अजित पवार यांनी परस्पर बैठक घेऊन आता भाजपची नाराजी ओढवून घेतली आहे.

ग्रामीण भागात विजेबाबत शेतकर्‍यांच्या तक्रारी आहेत. आमदारांनी याबाबत माहिती देताच अजित पवार यांनी सोमवारी महावितरणच्या अधिकार्‍यांसोबत बैठक घेतली. विशेष म्हणजे, भाजपचे वर्चस्व असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा व अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, नगर, कोपरगाव या भागात विजेच्या समस्या होत्या. त्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी ऊर्जा विभागाची बैठक घेतली. सोलापुरात भाजपचे नेते विजयसिंह मोहिते- पाटील, तर अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे-पाटील यांची ताकद आहे. मोहिते-पाटील राष्ट्रवादीतून, तर विखे-पाटील यांनी काँग्रेसला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. असे असताना या दोन बड्या नेत्यांच्या जिल्ह्यांत आणि फडणवीस यांच्या खात्यात अजित पवार यांनी हस्तक्षेप केला. उपमुख्यमंत्री असल्यामुळे इतर खात्यांची बैठक घेत असताना संबंधित खात्याचे मंत्री या बैठकीला उपस्थित असणे आवश्यक असते. हा आतापर्यंतचा शिष्टाचार आहे; पण या शिष्टाचाराकडे अजित पवार यांनी डोळेझाक केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

‘कोणत्याही विभागाची बैठक घेऊ शकतो’

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, अर्थमंत्री या नात्याने आपण कोणत्याही विभागाच्या बैठका घेऊ शकतो. निधी उपलब्ध करून देऊ शकतो, असे म्हणत त्यांनी बैठकीचे समर्थन केले आहे.

Back to top button