धनगर आरक्षण : राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षाचा निषेध करत युवकांनी केले मुंडन | पुढारी

धनगर आरक्षण : राज्यकर्त्यांच्या दुर्लक्षाचा निषेध करत युवकांनी केले मुंडन

जामखेड : पुढारी वृत्तसेवा : धनगर आरक्षणप्रश्री चोंडीत चालू असलेल्या आमरण उपोषणाकडे आज सातव्या दिवशीही सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ पाच तरूणांनी मुंडन केले. धनगर आरक्षणप्रश्री आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. मात्र कोणताही उच्चपदस्थ अधिकारी किंवा सरकारमधील कोणताही मंत्री या आंदोलनाकडे फिरकला नाही. विशेष म्हणजे दुरध्वनीवरही या आंदोलनाची साधी चौकशी सुध्दा या सरकारमधील मंत्र्यांनी घेतलेली नाही.

दरम्यान उपोषणकर्ते अण्णासाहेब रूपनवर आणि सुरेश बंडगर यांची प्रकृती खूपच खालावली असल्याने,चिंता व्यक्त केली जात असतानाच, सरकार दखल घेत नसल्याने ,धनगर समाज बांधवामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याचे यशवंतसेनेचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव दांगडे यांनी सांगितले. याप्रश्री सरकारच्या निषेधार्थ चोंडीत सूरू असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आलेल्या किरण धालपे (पुणे ), प्रेम आगुणे (कोल्हापुर) , स्वप्निल नेमाणे (जेजुरी) , बाळा गायके (बीड) , ॲड. रणजीत कारंडे (जामखेड) या पाच तरूणांनी मुंडन करून घेत,सरकारचा निषेध केला.

धनगर आरक्षणप्रकरणी  या सरकारला चिगळावयाचा असल्याचा आरोप यशवंतसेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी करत, धनगर समाज आरक्षणप्रश्री येत्या काळात राज्यभरात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.

दरम्यान होळकर घराण्याचे वंशज भूषणसिंहराजे होळकर, राष्टवादी युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर , पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, बीड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डाॅ.शिवाजी शेंडगे, धनगर आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ, फलटनचे सभापती रामभाऊ ठेकळे, खंडाळयाचे सभापती राजाभाऊ धायगुडे यांच्यासह हजारो लोकांनी आंदोलनस्थळी भेट देवून, आमरण उपोषणाला पाठींबा दिला.

हेही वाचा :

Dhangar reservation : हे सरकार निर्दयी सरकार; धनगर आरक्षणप्रश्नी सुप्रिया सुळेंची सरकारवर जहरी टीका

अहमदनगरमधील अदृश्य शक्ती काँग्रेससोबत; आ. बाळासाहेब थोरात यांचा दावा

Back to top button