देवळा; पुढारी वृत्तसेवा : देवळा बाजार समितीमध्ये परवाना धारक व्यापारी व नाफेड यांच्या कांदा खरेदीत बाजार भावात तफावत दिसून आल्याने परवानाधारक व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी काही काळ बंद ठेवली. त्यानंतर संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करून आज (दि.१२) आंदोलन केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज सकाळी ११ वाजता देवळा बाजार समितीमध्ये खरेदीदार व्यापाऱ्यांबरोबर नाफेडचे व्यापारी कांदा खरेदीसाठी उतरले असताना व्यापाऱ्यांनी नाफेड जादा भावाने खरेदी करतो, म्हणून व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडला. याचा उद्रेक होऊन संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारासमोर रास्ता रोको आंदोलन करून मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला.
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष माणिक निकम यांनी कांद्याचे बाजार भाव पडले आहेत. नाफेडने कांदा खरदेसाठी सुरुवातीपासून माल खरेदी करण्यासाठी लिलावात सहभागी होणे आवश्यक होते.
मध्यंतरी बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात असताना नाफेडने शिरावर खरेदी करून शेतकऱ्यांची लूटमार केली आहे. आता आवाक कमी झाल्याने नाफेडने बाजारात उतरून कांदा खरेदीला सुरुवात केली आहे. मात्र, आता कांदा अल्प प्रमाणात शिल्लक असताना व बाहेर कांद्याचे दर कमी असल्याने नाफेडच्या दरात व्यापारी कांदा खरेदी करू शकत नाही. तसेच शेतकऱ्यांना दोन पैसे जादा मिळत असताना व्यापाऱ्यांनी लिलाव बंद पाडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार सुरू केला आहे.
यावेळी बाजार समितीचे सभापती योगेश आहेर व तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी हस्तक्षेप करून व्यापाऱ्यांच्या व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन लिलाव पूर्ववत करण्याची सूचना दिली. यानंतर लिलाव सुरु झाल्यावर व्यापाऱ्यांनी २०० ते २५० रुपयांच्या घसरणीत कांदा खरेदी केला. आज देवळा बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात कांद्याची जवळपास सात हजार क्विंटल इतकी अवाक होऊन बाजार भाव कमीतकमी २५०, जास्तीतजास्त २१२५ तर सरासरी १९२५ असा होता. कांद्याच्या बाजार भावात दिवसेंदिवस सुरु असलेल्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा