Vijay Wadettiwar : मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान, केंद्राकडून मदतीची अपेक्षा!

Vijay Wadettiwar : मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान, केंद्राकडून मदतीची अपेक्षा!

मुंबई; पुढारी ऑनलाईन : गेल्या तीन दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसाने मराठवाड्यात अक्षरश: अस्मानी संकट कोसळले. यामुळे रस्ते, पूल, वीज, सिंचन विभागाचे सर्वांधिक नुकसान झाले असल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली आहे.

मराठवाड्यातील ४५२ पैकी ३८१ महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली आहे. १२७ ठिकाणी चारवेळा अतिवृष्टी झाली आहे. यामुळे प्रंचड मोठे नुकसान झाले आहे. रस्ते, शेतीतील वीजपंप वाहून गेले आहेत. जमीन खरडून गेली आहे. नदी आणि नाल्यांनी प्रवाह बदलला असल्याचे सांगत विजय वडेट्टीवार यांनी केंद्राच्या मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. २२ लाख हेक्टर शेतजमीन उद्धवस्त झाली आहे.

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा नक्की आकडा सांगता येणार नाही. त्याचे आता पंचनामे केले जातील, असेही त्यांनी म्हटले आहे.
राज्यात वेगवेगळ्या भागात पावसाशी संबंधित घटनांमध्ये आतापर्यंत ४३६ जणांचा बळी गेला आहे. सप्टेंबर महिन्यात ७१ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे रस्ते, पुलांचे नुकसान झाले असून विहिरी बुजल्या आहेत.

राज्यातील नेमके किती जिल्हे प्रभावित आहेत याची माहिती गोळा केली जात आहे. ओला दुष्काळाबाबत येत्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार असल्याचे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सांगितले.

सोमवारी मध्यरात्रीपासून मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे मराठवाड्यात अक्षरश: अस्मानी संकट कोसळले आहे. ठिकठिकाणी पूर आला असून तलाव, धरणे भरून वाहू लागली आहेत. अनेक गावांचा काही काळ संपर्क तुटला. या जलसंकटात आतापर्यंत दहा नागरिकांचा मृत्यू झाला असून २०३ जनावरे वाहून गेली.

उस्मानाबाद, नांदेड जिल्ह्यांत घरांवर अडकलेल्या ४५ जणांना एनडीआरएफच्या पथकाने सुरक्षितस्थळी हलविले.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news