बिहार विधानसभेत हंगामा, नितीश कुमार सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीच विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा

बिहार विधानसभेत हंगामा, नितीश कुमार सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वीच विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा
Published on
Updated on

पाटणा; पुढारी ऑनलाईन : बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडी सरकारची आज विधानसभेत बहुमत चाचणी आहे. त्याआधीच विजय कुमार सिन्हा आपल्या पदावरुन पायउतार झाले आहेत. २४३ सदस्यीय विधानसभेतील १६५ आमदारांनी नितीश कुमार यांना पाठिंबा दिला आहे. सिन्हा यांनी असा दावा केला की, अचानक सरकार बदलल्यानंतर त्यांना स्वतःहून राजीनामा द्यायचा होता. पण अविश्वास प्रस्ताव आणल्याचे कळल्यानंतर राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सिन्हा घाईघाईने सभागृहातून बाहेर पडले. यावेळी भाजपच्या आमदारांनी 'भारत माता की जय' आणि 'जय श्री राम' अशा घोषणा दिल्या.

अध्यक्षपदाची खुर्ची म्हणजे 'पंच परमेश्वर' आहे. या खुर्चीवर संशय घेऊन तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे?. जनता निर्णय घेईल, असे बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार सिन्हा यांनी त्यांच्याविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर बोलताना सभागृहात सांगितले. मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा अविश्वास ठराव (अध्यक्षांविरुद्ध) अस्पष्ट आहे. प्राप्त झालेल्या नऊ पैकी आठजणांची पत्रे नियमानुसार नव्हती, असे त्यांनी नमूद केले.

मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखाली महागठबंधन सरकार बिहारमध्ये सत्तेत आले आहे. या सरकारची आज बहुमत चाचणी आहे. त्यासाठी बिहार विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यादरम्यान विजय कुमार सिन्हा यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी सिन्हा यांनी आपल्या २० मिनिटांच्या भाषणात मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेत गदारोळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

सीबीआयची छापेमारी

दरम्यान, हरियाणा येथील ग्रुरुग्राम जिल्ह्यातील सेक्टर ७१ मध्ये असलेल्या एका मॉलवर सीबीआयने छापे टाकले. गुरुग्राम येथील मॉलमध्ये बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचे कार्यालय आहे. सीबीआयने नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरणात ही कारवाई केली. या आधी सीबीआयने बुधवारी बिहारमधील २४ ठिकाणांवर छापेमारी केली होती. मॉलमधील व्हाइट लँड कॉर्पोरेशन प्रायव्हेट कंपनी तेजस्वी यादव यांच्या कुटुंबांशी संबंधित आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news