पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील एका खासगी कंपनीचे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरले आहे. अमेरिकेच्या ह्यूस्टन येथील 'इंटुएटिव्ह मशिन्स' (Intuitive Machines) नावाच्या या कंपनीच्या मून लँडरचे नाव आहे 'ओडिसियस' असे आहे. चंद्रावर अंतराळयान उतरवून ही पहिली व्यावसायिक कंपनी बनली आहे. तसेच 'ओडिसियस' हे ५० वर्षांनी चंद्रावर उतरणारे पहिले अमेरिकेचे अंतराळयान ठरले आहे.
न्यूयॉर्कच्या वेळेनुसार गुरुवारी सायंकाळी ६.२३ वाजता हे यान चंद्राच्या ध्रुवाजवळ उतरले. एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' कंपनीच्या रॉकेटच्या सहाय्याने हे मूनलँडर पाठवण्यात आले होते. लँडर सरळ उभे असून त्याने डेटा पाठवायला सुरुवात केली आहे. आता आम्ही चंद्राच्या पृष्ठभागावरील पहिल्या प्रतिमा डाउनलिंक करण्याचे काम करत असल्याची माहिती 'इंटुएटिव्ह मशिन्स'ने X वर पोस्ट करत दिली आहे.
चांद्रभूमीवर आतापर्यंत पाच देशांच्या मूनलँडरनी यशस्वीपणे लँड केलेले आहे. आता अमेरिकेतील एका खासगी कंपनीचे यानही चंद्रावर उतरले आहे. यान खाली आणून स्थापित करण्यासाठी नियंत्रकांना काही मिनिटे लागली. पण अखेरीस एक सिग्नल प्राप्त झाला.
फ्लाइट डायरेक्टर टिम क्रेन यांनी जाहीर केले, "आम्ही निःसंशयपणे पुष्टी करू शकतो की आमची उपकरणे चंद्राच्या पृष्ठभागावर आहेत आणि आम्ही प्रसारित करत आहोत. " यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून हा आनंद साजरा केला.
या कंपनीने 'नासा'बरोबर ११८ दशलक्ष डॉलर्सचा करार केला आहे. चंद्रावर लँड करणारे पहिले खासगी मूनलँडर यानिमित्ताने पाहायला मिळाले. यापूर्वी खासगी कंपन्यांचे असे प्रयत्न अपयशी ठरले होते. अमेरिकन खासगी कंपनी 'अॅस्ट्रोबोटिक'चे मूनलँडर चंद्रावर उतरवण्याची मोहीम याचवर्षी अपयशी ठरली होती. 'इंटूएटिव्ह मशिन्स'ने स्पेसएक्सच्या 'फाल्कन ९' रॉकेटच्या सहाय्याने हे मूनलँडर पाठवले होते. गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. (Intuitive Machines)
हे ही वाचा :