अंतराळात उडणार रशिया-अमेरिका युद्धाचा भडका? | पुढारी

अंतराळात उडणार रशिया-अमेरिका युद्धाचा भडका?

वॉशिंग्टन, वृत्तसंस्था : अमेरिकन उपग्रहांना डोळ्यांसमोर ठेवून अंतराळातील अण्वस्त्र सज्जतेकडे रशियाचा प्रवास सुरू झाला आहे. अमेरिकन उपग्रहांना लक्ष्य करून अंतराळात अण्वस्त्रे पेरण्याच्या रशियाच्या तयारीबद्दलचा गुप्तचर अहवाल समोर येताच अमेरिकन गोटात घबराट पसरली आहे. वॉशिंग्टन येथे या विषयावर तातडीची बैठक बोलावण्यात आली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झेक स्युलिव्हन यांनी, हा चिंतेचा विषय आहे, असे या बैठकीत स्पष्ट केले.

सध्या रशिया-युक्रेन, इस्रायल-पॅलेस्टाईन असे 4 देशांत युद्ध सुरू आहे. युक्रेन आणि इस्रायल हे अमेरिकेचे निकटवर्तीय देश आहेत. युक्रेनला सर्व प्रकारची मदत अमेरिकेकडून होत असतानाही रशिया मागे हटत नसल्याने व्लादिमीर पुतीन यांचा आक्रमक पवित्रा किती तीव्र आहे, हे लक्षात येते. पुतीन यांनी परवापरवाच आपण कितीही ताकद पणाला लावली तरी रशिया माघार घेत नाही हे अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांना आताशा लक्षात आलेच असेल, असा दरारा बोलून दाखविला होता, हे येथे उल्लेखनीय!

भारताकडेही उपग्रहविरोधी शस्त्रे

‘पृथ्वी एअर डिफेन्स’ ही प्रणाली भारताकडेही आहे. क्षेपणास्त्रांसाठी असलेल्या या प्रणालीला ‘प्रद्युम्न बॅलिस्टिक मिसाईल इंटरसेप्टर’ म्हणतात. ही प्रणाली अंतराळात आणि पृथ्वीच्या वातावरणातही लक्ष्यांवर हल्ला करण्यास सक्षम आहे.

अमेरिकेच्या चिंतेची 4 कारणे

* रशियाची उपग्रहविरोधी शस्त्रनिर्मिती ही अमेरिकेसाठी चिंतेची बाब आहे. रशियन हल्ल्यांत अंतराळातील अमेरिकन उपग्रह नष्ट होतील.
* दळणवळण-नेव्हिगेशन तर ठप्प होईलच; पण अमेरिकेची लक्ष्यभेद प्रणालीही बर्‍यापैकी उपग्रहांवर अवलंबून आहे, तीही ठप्प होईल.
* रशियाने अमेरिकन सॅटेलाईट नेटवर्क नष्ट केल्यास जलवाहतूक, टेहळणी यंत्रणेवरही विपरीत परिणाम होईल.
* सध्या रशियन अंतराळ अण्वस्त्रांचा मुकाबला करण्याची आणि आपल्या उपग्रहांचे संरक्षण करण्याची क्षमता अमेरिकेकडे नाही.

काय म्हणतो रशिया?

आम्ही अंतराळात अण्वस्त्रे तैनात करत आहोत आणि अमेरिकन सॅटेलाईट नेटवर्क आमच्या निशाण्यावर आहे, हा अमेरिकेचा अहवाल निराधार आहे, असे रशियाचे उपपरराष्ट्र मंत्री सर्जेई रियाबकोव्ह यांनी म्हटलेले आहे. दुसरीकडे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Back to top button