पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचे निशाण फडकावत सवता सुभा मांडल्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले. तर १५ आमदार ठाकरे यांच्यासोबत राहिले आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या १५ आमदारांना पत्र लिहून धमक्या किंवा ऑफरच्या दबावाला बळी न पडता, कठीण काळात पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे ४० आमदारांनी बंड करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. यातून सावरत ठाकरे यांनी शिवसेना नव्याने उभारण्यासाठी शिवसैनिकांना आश्वस्त केले आहे. तर संकट काळात आपल्यासोबत राहिलेल्या आमदारांचे आभार मानले आहेत.
दरम्यान, आज (दि.११) मातोश्री निवासस्थानी शिवसेनेच्या सर्व खासदारांची बैठक हाेणार आहे. पुढील आठवड्यात राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची बैठक आज बोलावली आहे, अशी माहिती सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत पक्षाच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी शिवसेनेच्या काही खासदारांनी नेतृत्वाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यास सांगितले होते. गेल्या आठवड्यात शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राजेंद्र गावित यांनी ठाकरे यांना पत्र लिहून मुर्मू यांना पक्षाने पाठिंबा देण्याची मागणी केली होती.
दरम्यान, शिवसेनेने यापूर्वी 'एनडीए'च्या विराेधात भूमिका घेत काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. जुन्या मित्रपक्ष भाजपला डावलून महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यामुळे शिवसेना २०१९ मध्ये एनडीएतून बाहेर पडली होती.
हेही वाचलंत का ?