आंबेमोहोर महागला; लागवडीअभावी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातील उत्पादनात घट | पुढारी

आंबेमोहोर महागला; लागवडीअभावी मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातील उत्पादनात घट

शंकर कवडे

पुणे : उत्पादनात झालेली घट तसेच निर्यातीत झालेली वाढ यामुळे आंबेमोहोर तांदूळ महागला आहे. मागील दोन महिन्यांत भावात किलोमागे दहा ते पंधरा रुपयांनी वाढ होऊन क्विंटलचे भाव 7 हजार 500 रुपयांवर पोहोचले आहेत, तर किरकोळ बाजारात भाव 75 ते 85 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. तांदळाचा राजा म्हणून ओळखला जाणारा सुंगधी आंबेमोहोरला पुणेकरांकडून मोठी मागणी राहते. देशात मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश येथे आंबेमोहोर तांदळाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते. यंदा भात उत्पादित क्षेत्रात उत्पादन कमी झाले आहे.

त्यामुळे मागील वर्षी ज्या भाताची 3 हजार ते 3 हजार 200 रुपयांना विक्री झाली. त्यामध्ये यंदा शेतकर्‍यांनी तीनशे ते चारशे रुपयांनी वाढ करत त्याची 3 हजार 500 ते 3 हजार 700 रुपयांनी विक्री केली. याखेरीज, अमेरिका व युरोप पाठोपाठ बांगलादेश व सौदी अरबमधून मागणी वाढल्याने निर्यातीतही वाढ झाली. परिणामी, शहरातील बाजारपेठांमध्ये तांदळाची भाववाढ होऊन प्रतिक्विंटलचे भाव 7 हजार ते 8 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. जे मागील वर्षी 6 हजार ते 6 हजार 500 रुपये होते.

शेतकर्‍यांची कोलमला पसंती
यंदा शेतकर्‍यांनी मागील वर्षीच्या तुलनेत आंबेमोहोरची लागवड कमी करून कोलम तांदळाची लागवड जास्त केली आहे. आंबेमोहोर म्हणजेच विष्णूभोग तांदळाला लागणारा जास्त उत्पादन खर्च तसेच उत्पादन मिळण्यास लागणारा अधिकचा वेळ हे त्याचे प्रमुख कारण आहे. कोलम तांदळाला अडीच महिने तर आंबेमोहोर तांदळाचे उत्पादन येण्यास साडेतीन महिने इतका कालावधी लागतो. यामुळे शेतकर्‍यांनी आंबेमोहोरचे उत्पादन कमी केले आहे.

शहरीकरणाचा फटका…
महाराष्ट्रात कामशेत, भोर या भागात काही प्रमाणात आंबेमोहोरचे उत्पादन घेतले जाते. काही वर्षांपूर्वी आंबेमोहोरचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात घेतले जात होते, परंतु हा तांदूळ पिकणार्‍या पुणे, मावळ, भोर, कामशेत या पट्ट्यात झपाट्याने शहरीकरण वाढले व जमिनींना चांगला भाव आला म्हणून बर्‍याच शेतकर्‍यांनी जमिनी विकल्या. हे वर्षातून एकदाच घेतले जाणारे पीक असल्यामुळे आणि पीक येण्यास जास्त वेळ लागत असल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी त्याचे उत्पादन घेणे कमी केले. म्हणून आंबेमोहोर महाराष्ट्रातून कमी होत चालला आहे.

राज्यात जवळपास ऐंशी टक्के आंबेमोहोर हा मध्य प्रदेश व उर्वरित वीस टक्के तांदूळ हा आंध— प्रदेश येथून राज्यात दाखल होतो. यंदा उत्पादनात घट व निर्यातीत वाढ झाल्याने मागील दोन महिन्यात प्रत्येकवेळी 500 ते 700 रुपये प्रतिक्विंटल एवढी भाववाढ झाली आहे.

                                                             – राजेश शहा, तांदळाचे व्यापारी

Back to top button