म्हणून बंडखोर आमदार सामंतांच्या गाडीवर हल्ला?…वाचा ‘इनसाईड स्टोरी’

पुणे : आ. उदय सामंत यांच्या मोटारीची शिवसैनिकांनी केलेली तोडफोड.
पुणे : आ. उदय सामंत यांच्या मोटारीची शिवसैनिकांनी केलेली तोडफोड.
Published on
Updated on

पुणे, पुढारी वृत्तसेवा : हडपसर येथील कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार तानाजी सावंत यांच्या निवासस्थानी निघाले होते. त्यावेळी उदय सामंत यांची गाडी देखील मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत होती. कात्रज परिसरातील अदित्य ठाकरे यांची सभा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तानाजी सावंत यांच्या घरची भेट, या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेत पोलिसांनी काटेकोर नियोजनही केले होते. अशातच सामंत यांनी निर्धारीत कॅनव्हॉय सोबत न जाता मार्ग सोडून भरकटले, अन् थेट ते अदित्य ठाकरे यांच्या सभे जवळील कात्रज परिसरात पोहचले. त्यावेळी सभा संपवून निघालेल्या कार्यकर्त्यांनी सामंत यांना पाहताच त्यांच्या गाडीवर हल्ला केल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तीन दिवसांची पोलिस कोठडी

दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर मंगळवारी रात्री कात्रज चौकात हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यासह सहा जणांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने सर्वांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पी. जी. तापडिया यांनी हा आदेश दिला.
मोरे यांच्यासह अ‍ॅड. संभाजी हनुमंत थोरवे, राजेश बाळासाहेब पळसकर, सुरज नथुराम लोखंडे, चंदन गजाभाऊ साळुंखे यांना अटक करण्यात आली असून, आणखी चौदा जणांवर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर खुनाचा प्रयत्न, सरकारी कामकाजात अडथळा आणणे, बेकायदा जमाव जमविणे, चिथावणीखोर वक्तव्य करणे आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वाहनचालक विराज विश्वनाथ सावंत (वय 33) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अशी आहे गुन्ह्याची फिर्याद

मंगळवारी रात्री आमदार उदय सामंत व त्यांचे पीए त्यांच्या लॅण्ड क्रूझर कारने जात असतना कात्रज चौकात ठाकरे गटाचे बबन थोरात यांनी सभेत चिथावणीखोर भाषण केले होते. त्यामुळे प्रेरित होऊन संशयीत आरोपींनी बेकायदेशिर जमाव जमवला. यावेळी राजकीय मतभेद व आकसापोटी आम्हास जीवे ठार मारण्यासाठी हॉकी स्टीकने हल्ला करून दगड, चप्पल हाताच्या बुक्याने मारून गाडीची मागची काच फोडली. तसेच येथील स्थानिक पोलिसांनाही यावेळी धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळला आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा तपास गुन्हे निरीक्षक संगिता यादव करत आहे.

म्हणून मागितली सरकारी वकीलांनी पोलिस कोठडी

याप्रकरणात अटक केलेल्या सहा शिवसैनिकांना बुधवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. या घटनेत आरोपींचा उद्देश काय होता, याचा तपास करायचा आहे. आरोपींनी गुन्हा करताना वापरलेली हत्यारे (काठी, हॉकी स्टिक इत्यादी) जप्त करायची आहेत, अन्य आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करायची आहे. त्यासाठी आरोपींना आठ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सहायक सरकारी वकील वर्षाराणी जाधव यांनी केला.

बचाव पक्षाचा युक्तीवाद हा तर राजकीय अकसापोटीचा गुन्हा

बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरे, अ‍ॅड. मयूर लोढा, अ‍ॅड. अतुल पाटील यांनी बाजू मांडली. यावेळी राजकीय आकस व दबावातून संशयीत आरोपींवर खोटा व बनावट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबनराव थोरात हे घटनास्थळी उपस्थित नव्हते. त्यांना मुंबईवरून अटक करण्यात आली आहे, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला.

पदाधिकारी घटनास्थळी नसताना त्यांच्यावर गुन्हा

आमदार सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून त्यामध्ये एकही शिवसेना पदाधिकारी सहभागी असल्याचे दिसून येत नाही. फिर्यादी हे सरकारी कर्मचारी नाहीत. त्यामुळे कलम 353 लागू होत नसल्याचे बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने सहा जणांना 6 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news