राजकारणात हार-जीत असते, मात्र आता संपवायची भाषा; उद्धव ठाकरेंचे जे. पी. नड्डांना उत्तर | पुढारी

राजकारणात हार-जीत असते, मात्र आता संपवायची भाषा; उद्धव ठाकरेंचे जे. पी. नड्डांना उत्तर

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना पक्ष संपलेला आहे, असे विधान एका कार्यक्रमात केले होते. या विधानाचा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. शिवसैनिकांना संबोधित करताना ते आज (दि.३) बोलत होते. राजकारणात हार -जीत होत असते, मात्र आता संपवायची भाषा केली जात आहे, असे ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आपला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास आहे. आपली कायदेशीर लढाई सुरूच राहील, असे ठाकरे यांनी सांगितले. शिवसेना फोडण्याचे अनेकदा प्रयत्न करण्यात आले. मात्र, अनेक आव्हाने पायदळी तुडवत आम्ही झेंडा रोवला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आजचा युक्तीवाद पूर्ण झाला आहे, उद्या सकाळी पुन्हा सुनावणी होणार आहे. उद्या पहिल्या क्रमांकाचे प्रकरण ऐकले जाईल, असे कोर्टाने म्हटले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिका फेटाळण्याची विनंती केली होती. आज, बुधवारी राज्यातील राजकीय स्थितीवर सर्वोच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ राज्यातील सत्ता संघर्षासंबंधी दाखल सर्वच याचिकांवर एकत्रित सुनावणी झाली. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष कुणाचा? यावर निर्णय घेण्यास मनाई आदेश जारी करण्याची विनंती ठाकरे गटाने केली होती. परंतु, शिंदे गटाने देखील शिवसेनेवर दावा केला आहे. शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे यांच्याकडून युक्तीवाद केला. उद्या सकाऴी पुन्हा कोर्टात सुनावणी होणार आहे. आमदार अपात्रतेबाबत कोर्ट काय निर्णय देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button