अमरावतीत कोसळली दुमजली इमारत; प्रसंगावधान राखल्याने जीवितहानी टळली!

अमरावतीत दुमजली इमारत कोसळली
अमरावतीत दुमजली इमारत कोसळली
Published on
Updated on
अमरावती, पुढारी वृत्तसेवा : शहरात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अतिशय गजबजलेल्या परिसरात दुमजली इमारत कोसळली. संतततार पावसाने गुरुवारी (१४ जुलै) दुपारच्या सुमारास ही घटना घडली.
शहरातील सर्वाधिक गजबजलेल्या गांधी चौक ते अंबादेवी मार्गावरील दुमजली इमारतीत खालच्या मजल्यावर श्रीकृष्ण दूध डेरी आणि वरच्या मजल्यावर नरेंद्र इलेक्ट्रॉनिक्स अशी दुकाने होती. सकाळी नेहमीप्रमाणे डेअरीचे संचालक गुप्ता यांनी आपली दूध डेरी उघडली होती. दुपारच्या सुमारास इमारतीच्या मागच्या बाजूची भिंत खचत असल्याचे लक्षात येताच गुप्ता आणि डेअरीत काम करणारे कामगार लगेच बाहेर धावून आले. त्यानंतर काही क्षणातच संपूर्ण इमारत कोसळली. सुदैवाने दूध डेअरीमधील सर्वजण आधीच बाहेर धावून आल्यामुळे या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.
अमरावतीत दुमजली इमारत कोसळली
अमरावतीत दुमजली इमारत कोसळली
गुरुवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहरातील सर्वाधिक गजबजलेला गांधी चौक ते अंबादेवी मार्गावर रोजच्यापेक्षा गर्दी कमी होती. इमारत कोसळणार याचा अंदाज आल्यावर इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या दूध डेअरीमधील कामगार इमारती बाहेर पडल्यामुळे परिसरात आरडाओरड झाली. हा रस्ता परिसरातील युवकांनी रहदारीसाठी बंद केला. या मार्गावर सकाळी आणि दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात शाळकरी विद्यार्थ्यांची गर्दी असते. मात्र, पाऊस सुरू असल्यामुळे आज नेहमीपेक्षा गर्दी कमी होती. परिसरातील युवकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे हा मार्ग बंद करण्यात आला.  त्यामुळे इमारत कोसळली त्यावेळी अतिशय गर्दीच्या या मार्गावर शुकशुकाट होता.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. रस्त्यावर पडलेला इमारतीचा ढिगारा बाजूला करण्याचे काम जेसीबीच्या माध्यमातून करण्यात आले. अग्निशमन दलाचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. गांधी चौक परिसरात इमारत कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह या पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांच्यासह घटनास्थळी पोहोचल्या. पोलीस आयुक्तांनी संपूर्ण परिसराची पाहणी केली तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोसळलेल्या इमारती संदर्भात माहिती जाणून घेतली. पोलिसांनी गांधी चौककडून अंबादेवी मंदिर परिसर तसेच गौरक्षणकडे जाणारा मार्ग तातडीने बंद केला आहे.
हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news