अमरावती : उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर १० जणांना धमक्या, चारजण ताब्यात | पुढारी

अमरावती : उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर १० जणांना धमक्या, चारजण ताब्यात

अमरावती; पुढारी ऑनलाईन : भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्या लोकांना फोनवरुन धमकी देणाऱ्या चार जणांना अमरावती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संशयितांची चौकशी केली जात असल्याची माहिती सिटी कोतवाली पोलिस स्थानकाच्या पोलिस निरीक्षक नीलिमा अराज यांनी दिली.

भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह उद‍्गाराचे समर्थन केल्यामुळे उदयपूरपाठोपाठ महाराष्ट्राच्या अमरावती शहरातही एकाचा बळी घेण्यात आला होता. उदयपूर येथे मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलच्या वक्‍तव्यावरून नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्याने कन्हैयालाल यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्येचे पडसाद उमटत असतानाच अमरावतीतील औषध विक्रेते उमेश कोल्हे (५४) यांची गेल्या २१ जून रोजी अमरावतीत भररस्त्यात अडवून गळा चिरून झालेली हत्याही याच प्रकरणातून झाल्याचे आता समोर आले आहे. उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर अमरावतीमधील १० जणांना धमक्या देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले आहे.

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ लिहिलेला मजकूर उमेश कोल्हे व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवत होते म्हणून ही हत्या करण्यात आली. अमरावतीच्या कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी जनावरांचा डॉक्टर युसूफ खान बहादुर खान याला अटक केली आणि त्याच्या कबुलीतून नुपूर शर्मा प्रकरणाचा या हत्येशी संबंध असल्याचे स्पष्ट झाले. नुपूर शर्माला पाठिंबा देणारी पोस्ट लिहिल्यामुळेच कोल्हेंची हत्या झाल्याचे अमरावतीचे पोलीस उपायुक्‍त विक्रम साळी यांनी याआधी सांगितले आहे.

कोल्हे हे नुपूर शर्माला पाठिंबा देत असून तसा मजकूर व्हॉट्सअ‍ॅपवर पसरवत आहेत असा मेसेज या डॉक्टर खान यानेच व्हॉट्सअ‍ॅपवर टाकला. त्यातून कोल्हेंच्या हत्येसाठी चिथावणीच दिली गेली.

 

Back to top button