यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : medical student murder : संपूर्ण विदर्भातील वैद्यकीय क्षेत्र हादरविणाऱ्या भावी डॉक्टर खून प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ४८ तासांच्या आत अटक केली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
येथील श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अंतिम वर्षांमध्ये शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अशोक पाल याचा १० नोव्हेंबर रोजी रात्री निर्गुण खून करण्यात आला होता. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली. विदर्भातील सहा जिल्ह्यात मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी चौकशी करण्याचे दिले होते. त्यानुसार तब्बल सहा पथके निर्माण करून या प्रकरणाचा तपास करण्यात आला. सुरवातीला यातील दोन आरोपींना संशयित म्हणून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची १७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. यानंतर पुन्हा गोपनीय माहितीच्या आधारे ऋषिकेश गुलाबराव सवळे (वय २३) रा. महावीरनगर, प्रवीण संजीव गुंडजवार (वय २४) रा. सावित्रीबाई फुले सोसायटी व एक विधीसंघर्ष बालक यां तीन आरोपीना ताब्यात घेण्यात आले.
सखोल विचारपूस केली असता त्यांनी खूनाच्या गुन्ह्याची कबुली दिली. घटनेच्या दिवशी हे तिघेही दुचाकीवरुन जात असताना मृतक अशोक पाल यांना धक्का लागल्याचे कारणावरून त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर आरोपींनी अशोक पाल यांच्या छातीवर व पोटाखाली दोन ठिकाणी चाकूने वार केले व पळून गेले. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्यातील आरोपींना ४८ तासाच्या आत अटक केल्याने यवतमाळ जिल्हा पोलिस दलातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांना एक लाख रुपये रोख बक्षीस जाहीर केल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांनी यावेळी सांगितले.