पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोची जोरदार चर्चा सुरु आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युझर्सच्या संमिश्र प्रतिक्रीया या फोटोवर येत आहेत. संजय राऊत यांनी "नेमके हेच घडले!" असे लिहीत एक फोटो शेअर केला आहे. (Sanjay Raut Tweet)
महाराष्ट्रात राज्यसभा निवडणूका पाठोपाठ विधानसभेच्या निवडणूका झाल्या. विधानसभेच्या निवडणकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुध्द बंड पुकारले आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमयरित्या वळण मिळाले. शिवसेनेचे बहुतांश आमदार शिंदे गटाला मिळाले. गेले नऊ दिवस हे बंड सुरु होते. अखेर काल (२९ जून) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि या सत्तासंघर्षाला पूर्णविराम मिळाला.
बुधवारी झालेल्या फेसबुक लाईव्हच्या संवादात मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक खंत व्यक्त केली की, जे नाराज झाले त्यांनी खरे तर सुरत, गुवाहाटीला न जाता 'मातोश्री'वर येऊन तरी बोलायला पाहिजे होते. तुम्हाला आम्ही कधी तरी आपले मानले होते; मग मनातले सांगायची काय अडचण होती? शिवसेनाप्रमुखांनी रिक्षावाला, टपरीवाला, अगदी हातभट्टीवाल्यालाही मोठे केले. आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदे दिले. आतापर्यंत ज्यांना मोठे केले, जे-जे द्यायचे ते दिले तेच आज नाराज आहेत. मात्र, ज्यांना काही मिळाले नाही ते मात्र 'मातोश्री'वर येऊन मला साथ देत आहेत.
आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरुन एक फोटो शेअर करत लिहले आहे की,"नेमके हेच घडले…!" फोटोमधील व्यक्तीला पाठीमागुन खंजीर खुपसल्याचे दाखवले आहे. या ट्विटमध्ये जरी कोणाचा उल्लेख केला नसला तरी या ट्विटचा रोख हा शिंदे गटाच्या आमदारांवर असल्याचे लक्षात येते. या ट्विटवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेतच. बरोबर हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
हेही वाचलंत का?