उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचे सेलिब्रेशन केलं नाही : दीपक केसरकर

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचे सेलिब्रेशन केलं नाही : दीपक केसरकर
Published on
Updated on

पणजी : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील मतदारांनी २०१९ साली भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीला बहुमत दिले होते. कारण आम्ही एकत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता जे नवीन सरकार महाराष्ट्रात येणार आहे ते युतीचाच म्हणजेच महाराष्ट्रातील जनतेला हवे असलेले असणार आहे. आम्ही अद्यापही शिवसेनेत आहोत .शिवसेना पक्षाचे नेते हे उद्धव ठाकरेच राहणार आहेत. आम्ही शिवसेनेवर दावा केला नाही. आणि करणार नाही. मात्र विधिमंडळ गटाचे नेतृत्व हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच असणार आहे. शिवसेनेचे जे १६ आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत, त्यांना आमचा गट ३९ आमदारांचा असल्यामुळे आमच्या गटाच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल. असे प्रतिपादन शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी केले. आज दि. ३० रोजी गोवा येथील ताज रेसिडेन्सी कन्व्हेंशन सेंटर येथे दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.

या पत्रकार परिषदेपूर्वी एकनाथ शिंदे गटाचे ३९ आमदार व अपक्ष आमदारांची बैठक दोनापावला पणजी गोवा येथील ताज हॉटेलमध्ये झाली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले. तेथे देवेंद्र फडवणीस यांची भेट घेऊन सरकार स्थापनेच्या बाबत ते चर्चा करणार आहेत. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी सांगितले की, आमचे नेते हे एकनाथ शिंदे आहेत आणि आजच्या बैठकीमध्ये त्यांना पुढील वाटचाल ठरवण्याचे अधिकार दिलेले आहेत. अमुक व्यक्तीला मंत्री करणात , तमुक व्यक्तीला मंत्री करणार . अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्या फारच चुकीच्या असून आमच्या गटामध्ये फूट पाडण्यासाठी त्या मुद्दाम पसरवला जात असल्याचा दावा यावेळी केसरकर यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आम्हाला अत्यानंद झाला असे नाही. कारण आमचा जो लढा आहे तो उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा यासाठी नव्हताच . फक्त महाराष्ट्राच्या जनतेने विधानसभा निवडणूक बहुमत दिलेल्या युती अर्थात भाजपसोबत शिवसेनेचे सरकार स्थापन करावे अशी आमची मागणी होती. कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या पडेल उमेदवारांना शिवसेनेच्या आमदारांच्या विरोधात बळ देण्याचा प्रयत्न केला. सरकारच्या सर्व योजनांचा लाभ काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिला जात असे .आणि शिवसेनेचे आमदार फक्त निराश होऊन पहात होते.

या सर्व घडामोडींची कल्पना मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या आमदारांनी दिली. मात्र त्यांच्याकडून कारवाई झाली नाही. दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेच्या आमदारांना राहणे अत्यंत कठीण जात होते. त्याच बरोबर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसकडून शिवसेनेच्या उमेदवारांचा पाडाव करण्याचा प्रयत्न झाला . या सर्व कारणांमुळे शेवटी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वेगळा विचार केला आणि अलग होण्याचा प्रयत्न केला . तरीही शिवसेना सोडली नाही. आता जे सरकार येईल ते भाजप आणि शिवसेनेच्या असणार आहे. असेही केसरकर यांनी सांगितले .

संजय राऊत यांनी आमच्या गटामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नही संजय राऊत यांच्यामुळे झाले . ते जे जे वक्तत्व करत होते. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील संबंध दुरावत गेले. राज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारशी समन्वय आणि सलोखा असने नितांत गरजेचे आहे. आता येणारे सरकार केंद्राशी सलोखा राखून महाराष्ट्राचा विकास करील. असेही केसरकर यांनी सांगितले.

आपल्या सोबत असलेल्या २९ शिवसेना व इतर अपक्ष मिळून ५५ आमदारापैकी एकही आमदार हा मंत्रिपद मिळावे या आशेने आमच्या सोबत आलेला नाही. दोन्ही पक्षाचे नेते जे ठरवतील त्यानुसार मंत्रिपदाची वाटणी होईल. मात्र मतदारसंघाचा विकास ,हिंदुत्व या दोनच मुद्द्यावर आम्ही वेगळे झालेलो आहोत आणि एकत्र आलेला आहोत. असे केसरकर यांनी सांगितले.

संजय राऊत हे नेहमीच चुकीचे बोलतात . त्यांनी कमी बोलावे.त्यांनी आमच्या विरोधात महाराष्ट्रातील शिवसैनिकांना चिथावण्याचा प्रयत्न केला .आमच्या काही आमदाराच्या कार्यालयावर हल्ला त्यामुळे झाला. मात्र बहुसंख्य शिवसैनिकांना संजय राऊत यांचे बोलणे आवडत नाही. त्यामुळे त्या शिवसैनिकानी त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ही चांगली गोष्ट झाली .आम्ही कुणाच्याही पाठीत खंजीर खुपसलेला नाही . २०१९ साली महाराष्ट्रातील जनतेने युतीला बहुमत दिलं होतं ते बहुमत डावलून ज्यांना पराभूत केलं होतं त्या राष्ट्रवादी व कॉंग्रेस सोबत सरकार स्थापन करणे हेच पाठीत खंजीर खुपसणे होते. त्यामुळे आम्ही खंजीर खुपसला असा जो संजय राऊत यांनी आरोप केला आहे त्या आरोपात तथ्य नसल्याचे केसरकर यावेळी म्हणाले.

शिवसेना महाराष्ट्राची अस्मिता असून शिवसेना आणि भाजप हे सत्तेवर राहणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी पंचवीस वर्षापूर्वी भाजप सोबत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती केली होती. ती आम्ही पुढे नेत असल्यामुळे बाळासाहेबांचेच विचार आम्ही पुढे नेता आहोत हे शिवसैनिकांनी लक्षात घ्यावे असे सांगून सत्तेत असलेल्या शिवसेनापक्षाला संपवण्याचा विडा उचललेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष हे सत्तेवरून दूर झाले. ही शिवसेनेसाठी आणि महाराष्ट्रासाठी चांगली गोष्ट झाल्याचेही त्यांनी सांगितले. शिवसेनेमध्ये ठाकरे कुटुंबियांना आमचा विरोध नाही आणि विरोध नसणार. मात्र शिंदे यांच्यामागे पंचावन्न आमदारांचा गट असल्यामुळे एकनाथ शिंदे हेच आमचे नेते असतील, असे सांगून आमचा मुद्दा हा तत्वाचा आहे हिंदुत्वाचा आहे . शिवसेना वाचवण्याचा आहे. त्यामुळे आम्ही वेगळा गट केला होता. त्यात कुणी वाईट वाईट वाटून घेऊ नये. आम्ही पक्षावर दावा केलेला नाही, असे केसरकर म्हणाले. शिंदे यांना सर्वाधिकार आजच्या बैठकीत दिले असून ते मुंबईत जाऊन जो काही निर्णय घेतील तो सर्वांना मान्य असेल, असेही केसरकार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news