चालीसा अट्टाहास राणा दाम्पत्याच्या चांगलाच अंगलट; जेलमधील मुक्काम आणखी वाढला

चालीसा अट्टाहास राणा दाम्पत्याच्या चांगलाच अंगलट; जेलमधील मुक्काम आणखी वाढला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने आजही दिलासा दिलेला नसून ४ मे रोजी सकाळी ११ वाजता जामीनावर निकाल दिला जाणार आहे.

१४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असणाऱ्या राणा दाम्पत्यांच्या जामीन याचिकेवर शनिवारी (दि.३०) सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकीलांचा युक्तीवाद ऐकून घेत न्यायालयाने निर्णय सोमवारपर्यंत (दि.२) राखून ठेवला होता. राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसा प्रकरणाद्वारे राज्यातील सरकार पाडण्याचा कट रचला जात होता, असा युक्तीवाद राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकिलांनी करत राणा दाम्पत्यांच्या जामीनाला विरोध केला होता. दरम्यान, राणा दाम्पत्याची मुंबई उच्च न्यायालयाने २५ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी चांगलीच कानउघडणी केली होती. गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावत तगडा हादरा दिला होता. विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.

मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्यावर 124 अ आणि 353 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याविरोधात दोन स्वतंत्र एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन एफआयआरविरोधात राणा दाम्पत्याने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने राणा दाम्पत्याची चांगलीच हजेरी घेत फटकारले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणाऱ्या राणा दाम्पत्यांना खार पोलिसांनी अटक केली होती. त्या दोघांना वांद्रे न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत न्यायालयाने पुढील सुनावणी २९ एप्रिलला होईल, असे सांगितले होते.

दरम्यान, जामीन मिळेपर्यंत नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगात, तर रवी राणा यांना आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्या दोघांविरोधात राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. कलम १५३ (अ) अंतर्गत चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्यावर अटकेची कारवाई केली होती.

हेही वाचलंत का ? 

logo
Pudhari News
pudhari.news