राज्यपालांच्याहस्ते कृषिरत्न पुरस्कार स्वीकारण्यास शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा नकार | पुढारी

राज्यपालांच्याहस्ते कृषिरत्न पुरस्कार स्वीकारण्यास शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचा नकार

बारामती; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचे पुतणे आणि डॉ. आप्पासाहेब पवार यांचे पुत्र राजेंद्र पवार यांनी त्यांना जाहीर झालेला राज्य शासनाचा पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते स्वीकारण्यास नकार दिला आहे.

बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन असलेले राजेंद्र पवार हे पुरस्कार वितरण सोहळ्यास अनुपस्थित राहणार आहेत. राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज (सोमवार) नाशिकमध्ये या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. परंतु या कार्यक्रमाला जाणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.

बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्य़क्ष शरद पवार हे आहेत. त्यांचे पुतणे, पद्मश्री डॉ. आप्पाासाहेब पवार यांचे सुपुत्र राजेंद्र पवार हे चेअरमन आहेत. त्यांनी आजवर शेती क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पवार यांनी आनंद व्यक्त केला होता. परंतु ज्यांच्या हस्ते वितरण होत आहे हे समजताच त्यांनी सोहळ्याला जाणे मात्र टाळले.

राजेंद्र पवार यांची भूमिका… 

यासंबंधी राजेंद्र पवार म्हणाले, या सोहळ्याला न जाण्यामागे अनेक कारणे आहेत. हा महाराष्ट्र शिवरायांचा आहे. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागणार नाही, याची काळजी या महान राजाने घेतली. त्यांचा आदर्श आपल्यापुढे आहे. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय त्या पंजाबराव देशमुख यांनी कृषी धोरणात बदलासाठी मोठे योगदान दिले. शेतीच्या बाबतीत राज्य समृद्ध केले. मी आजवर शेती आणि शिक्षण क्षेत्रात काम केले. शिक्षण क्षेत्रात आपण महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे योगदान जाणतो. परंतु दुदैवाने गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

फुले दांपत्याविषयी खालच्या पातळीवर जावून मते मांडली जात आहेत. महाराष्ट्राचा इतिहास माहित नसणारे लोक अराजकता निर्माण करत आहेत. त्याला खतपाणी घालणाऱ्यांच्या हस्ते मी हा पुरस्कार कसा स्वीकारावा? त्याऐवजी एखाद्या कृषी कार्यालयात अथवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार मिळाला असता तर तो मी स्वीकारला असता.

Back to top button