प्रशांत किशोर यांची नवी इनिंग : आता स्‍वत:चा राजकीय पक्ष स्‍थापन करणार! | पुढारी

प्रशांत किशोर यांची नवी इनिंग : आता स्‍वत:चा राजकीय पक्ष स्‍थापन करणार!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

२०१४ लोकसभा निवडणुकीत भाजप, त्‍यानंतर संयुक्‍त जनता दल, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षांची रणनीती ठरवणारे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर नवी इनिंग खेळण्‍यासाठी सज्‍ज झाले आहेत. आता ते स्‍वत:चा राजकीय पक्ष स्‍थापन करणार असून, असे संकेत देणारे ट्‍वीट त्‍यांनी आज केले. ते आपल्‍या स्‍राजकीय प्रवासाचा प्रारंभ बिहारमधून करणार आहेत. प्रशांत किशोर यांची नवी इनिंग हा चर्चेतील विषय ठरला आहे. कारण  गेली आठ वर्षांहून अधिक काळ विविध राजकीय पक्षांसाठी निवडणूक रणनीती आखणारे प्रशांत किशोर स्‍वत:च्‍या पक्षाची रणनीती कशी आखणार? याकडे सर्व राजकीय पक्षांसह सर्वसामान्‍य जनतेचेही लक्ष असणार आहे.

प्रशांत किशोर यांची नवी इनिंग : पक्ष स्‍थापनेसाठी रणनीती आखण्‍यात व्‍यस्‍त

प्रशांत किशोर आपला राजकीय पक्ष केव्‍हा स्‍थापन करतील? या प्रश्‍नाचे उत्तर अद्‍याप मिळालेले नाही. मात्र देशातील सर्व राज्‍यांमध्‍ये त्‍यांचा पक्ष असेल. सध्‍या ते पक्ष स्‍थापनेची रणनीती आखण्‍यात व्‍यस्‍त आहेत. सध्‍या ते बिहारमध्‍ये असून येथूनच ते आपल्‍या नवा प्रवास सुरु करतील, असे मानले जात आहे.

जनताच खरे मालक

प्रशांत किशोर यांनी आपल्‍या ट्वीटमध्‍ये म्‍हटलं आहे की, लोकशाहीत योगदान देण्‍याची तळमळ आणि लोकांसाठी रणनीती आखण्‍यातील मागील काही वर्षात अनेक चढउतार आले. आता या प्रवासाकडे पाहिलं की वाटतं आता थेट लोकांमध्‍ये जाण्‍याची वेळ आली आहे. जनतेमध्‍ये जावून त्‍यांच्‍या समस्‍या अधिक चांगल्‍याप्रकारे जमजून घेता येतील आणि ‘जन सुराज’च्‍या मार्गावर पुढे वाटचाल करता येईल.

काँग्रेसबरोबर झाली होती चर्चा

प्रशांत किशोर यांची २०२४ लाेकसभा निवडणूक संदर्भात नुकतीच काँग्रेस नेत्‍यांबरोबर चर्चा झाली. ते लवकरच काँग्रेसमध्‍ये प्रवेश करतील असेही मानलं जात होते. मात्र आता ते स्‍वत:चा राजकीय पक्षांच्‍या स्‍थापन करणार अहेत.  त्‍यांचा पक्षाचा प्रचारासाठी आधुनिक तंत्रांचा वापर करेल. या पक्षाचा जनसंपर्क हा डिजिटल माध्‍यामतून होईल. पक्षाचे नाव काय असेल, हे अद्‍याप ठरलेले नाही,अशी माहिती सूत्रांनी दिली.

२०१४  निवडणुकीतील भाजपच्‍या विजयानंतर आले होते चर्चेत

२०१४ लोकसभा निवडणुकीतील भाजपच्‍या ऐतिहासिक विजयानंतर देशभरात प्रशांत किशोर हे नाव चर्चेत आले होते. देशातील निवडणूक रणनीतीकार अशी त्‍यांची ओळख बनली. आजपर्यंत निवडणूक काळात त्‍यांनी पडद्‍यामागून सुत्रे हलवत अनेक राजकीय पक्षांना सत्तेची खुर्ची दिली.

‘युनो’तील नोकरीचा दिला होता राजीनामा

प्रशांत किशोर यांचा जन्‍म १९७७ मध्‍ये बिहारमधील बक्‍सर जिल्‍ह्यात झाला. त्‍यांचे वडील हे बिहारमध्‍ये सरकारी डॉक्‍टर होते. तर आई उत्तर प्रदेशमधील बलिया जिल्‍ह्यातील होत्‍या. वयाच्‍या ३४ व्‍या वर्षी त्‍यांनी संयुक्‍त राष्‍ट्रेमधील (युनो) नोकरीचा राजीनामा दिला. २०११ मध्‍ये ते गुजरातचे तत्‍कालिन मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍या टीममध्‍ये दाखल झाले. यानंतर राजकारणातील प्रचार आणि प्रसिद्‍धी तंत्र कल्‍पने पलिकडे बदलले. प्रशांत किशोर यांनी २०१४ लोकसभा निवडणुकीपूर्वी उन्‍नत मार्केटिंग, चाय पे चर्चा, र्थीडी रॅली, रन फॉर युनिटी, मंथन असे अभियान राबवले. प्रशांत किशोर हे इंडियन पॉलिटिकल ॲक्‍शन कमिटी ही संस्‍थाही चालवतात. या संस्‍थेमध्‍ये नेतृत्त्‍व, निवडणूक रणनीती, प्रचार आणि भाषण याबाबत प्रशिक्षण दिले जाते.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

Back to top button